ऐन दिवाळीच्या तोंडावर धान्य पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:05 PM2017-10-03T16:05:44+5:302017-10-03T16:07:41+5:30
पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प : प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी पुकारला संप; जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रलंबित मागण्या निकाली निघत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पुरवठा विभागातील कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. परिणामी, मंगळवारी पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. केवळ संपावरच मर्यादीत न राहता कर्मचाºयांनी धान्य पुरवठाही बंद ठेवल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्य मिळण्यास अडचणी येणार आहेत.
निदर्शने करीत व्यक्त केला शासनाचा निषेध
२०१२ पासून पुरवठा विभागातील कर्मचारी त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, आजतागायत, या विभागातील कर्मचाºयांना केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्यामुळे आता संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उचलले आहे. या विभागातील कर्मचाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मन्सूर शेख, रत्नाकर वसईकर, अनिल हिसाळे, जितेंद्रसिंग राजपूत, विशाल मोहिते, सुरेश पाईकराव, विनोद चौधरी, आशा येलमामे, कामिनी महाले, वैशाली बोरसे, महेश पाटील, नीलेश सांगळे आदी उपस्थित होते.
धान्य पुरवठा केला बंद
जिल्ह्यात एकूण ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानदार आहेत. या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी संपामुळे आजपासून धान्य पुरवठा बंद केल्याची कल्पना दिली आहे.
जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ४७ हजार इतकी आहे. तर उर्वरीत प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धान्य पुरवठा बंदमुळे लाभार्थींना धान्य मिळण्यास अडचणी होणार आहे. जोपर्यंत प्रलंबित मागण्यांचा तोडगा सुटत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
१० पासून महसूल विभागाचे काम बंद आंदोलन
प्रलंबित मागण्यांचा प्रश्न शासनाने त्वरित प्रश्न सोडविला नाही; तर येत्या १० तारखेपासून महसूल विभागातील कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.
सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे पर्यायी व्यवस्था करून धान्याचा पुरवठा केला जाईल. - दत्तात्रय बोरूडे, जिल्हा पुरवठा अधिकारीशासनाकडे आमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहोत. परंतु, केवळ आश्वासने देऊन वेळ काढून नेली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आम्ही संप पुकारला आहे. आमच्या मागण्या सुटत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार आहोत.
- मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना