धुळे जिल्ह्यातील सात ग्रा.पं.चे निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:54 PM2018-05-28T13:54:41+5:302018-05-28T13:54:41+5:30
पाच ग्रा.पं. वर भाजपचे तर दोनवर कॉँग्रेसचे वर्चस्व
शिंदखेडा - तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी सकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. त्यात पाच ग्रा.पं.वर भारतीय जनता पक्षाने तर दोन ग्रा.पं.वर कॉँग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
तालुक्यातील परसामळ, साळवे, कंचनपूर, तावखेडा प्र.बो., वाघोदे, वालखेडा व कदाणे या सात ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार २७ रोजी मतदान घेण्यात आले होते. सोमवार २८ रोजी येथील तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणी सुरू होऊन १० वाजेपर्यंत सर्व ग्रा.पं.चे निकाल जाहीर करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाने परसामळ, साळवे, कंचनपूर, तावखेडा प्र.बो., वाघोदे या ग्रामपंचायतींमध्ये तर कॉँग्रेस पक्षाने वालखेडा व कदाणे या ग्रा.पं.च्या निवडणुकीत विजय मिळविला. लोकनियुक्त सरपंचपदी परसामळ ग्रा.पं.त नारायण भिमसिंग गिरासे, साळवे ग्रा.पं. इंदूबाई पुंडलिक फुलपगारे, कंचनपूर ग्रा.पं. गंगाबाई नेहरू पाटील, तावखेडा प्र.बो. राकेश आत्माराम भामरे, वाघोदे ग्रा.पं. गोविंदा पुंजू वाघ, कदाणे ग्रा.पं. सरला शरद पारधी या तर वालखेडा ग्रा.पं.च्या सरपंचपदी लक्ष्मण दशरथ मालचे विजयी झाले. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उमेदवारांसह समर्थकांनी गुलालांची उधळण विजयाचा जल्लोष केला.