धुळ्यातील आणखी एका डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:38 PM2020-08-19T22:38:52+5:302020-08-19T22:46:29+5:30
नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार
धुळे/सोनगीर : तालुक्यातील सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पेश प्रकाश वाघ (वय ४० वर्ष) यांचा कोरोनाने बुधवारी नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.दोन दिवसात धुळ्यातील दोन डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू
डॉ.कल्पेश वाघ यांना तीन दिवसापूर्वी लिव्हरच्या आजारासाठी धुळयातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू सोमवारी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने नाशिक येथे अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती जास्त खराब झाली व त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.डॉ.कल्पेश प्रकाश वाघ हे मुळचे धुळयातील जुने धुळे परिसरातील राहणार होते. त्यांचे शिक्षण नांदेड येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. नंतर त्यांनी नांदेड मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण देखील घेतले.
दोन वर्ष प्रभारी अधीक्षक डॉ.कल्पेश वाघ दोन वर्ष सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्रभारी अधीक्षक होते. दोन महिन्यापूर्वीच या पदावर अन्य डॉक्टरांची नियुक्ती झाल्यानंतर ते त्याचठिकाणी आपल्या वैद्यकीय अधिकारी या पूर्वपदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. डॉ.कल्पेश यांच्या पार्थिवावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. धुळ्यात दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू- मंगळवारी धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्यावर बुधवारी सकाळी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सोनगीरचे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कल्पेश वाघ यांचे कोरोनामुळे निधन झाले.