पपईला हवामानावर आधारीत विमा लागु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:02 PM2020-07-29T22:02:31+5:302020-07-29T22:02:49+5:30
कृषीभूषण प्रकाश पाटील : केळी पिकासाठीही दोन स्वतंत्र योजना सुरू करण्याची मागणी
धुळे : पपई या फळपिकाचा हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेत समावेश करावा़ तसेच डाळींब, संत्रा, मोसंबी या पिकांप्रमाणे केळी पिकाला देखील मृग व आंबिया बहारासाठी दोन स्वतंत्र योजना सुरू कराव्यात, अशी मागणी कृषीभूषण अॅड़ प्रकाश भुता पाटील यांनी केली आहे़
यासंदर्भात त्यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह कृषी विभागाचे सचिव, आयुक्त आणि फलोत्पादन आयुक्तालयाच्या संचालकांना निवेदन दिले आहे़
निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पपई पिकाला पोषक वातावरण आहे़ त्यामुळे १३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रवार पपईची लागवड झाली आहे़ पपई लागवडीचे प्रमाण वाढत आहे़ पपई फळ पिकाचा हवामानावर आधारीत पिक विमा योजनेत समावेश करावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे़ सन २०१५ मध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पुढील हंगामापासुन योजना लागू करण्याची घोषणा केली होती़ परंतु ही घोषणा हवेतच विरली़ राज्यात केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड असलेल्या स्ट्रॉबेरीचा योजनेत समावेश झाला़ परंतु अजुनपर्यंत पपई उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही़ त्यामुळे पुढील वर्षापासून पपईचा या योजनेत समावेश करावा अशी मागणी निवेदनात केली आहे़
तसेच महाराष्ट्रात केळीचे उत्पादन तीन बहारात घेतले जाते़ परंतु केळी पिकाचा केवळ आंबिया बहारासाठी योजनेत समावेश असल्याने विमा संरक्षण एकाच बहाराचे मिळते़ केळी उत्पादक शेतकरी आंबिया बहाराचा विमा भरतात़ परंतु प्रत्येक बहारात हवामान आणि धोके वेगवेगळे आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई मिळत नाही़ त्यामुळे संत्री, मोसंबी, डाळींब पिंकांप्रमाणेच केळी पिकाला देखील मृग बहार आणि आंबिया बहार अशा दोन स्वतंत्र योजना लागु करुन विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी कृषीभूण प्रकाश पाटील यांनी केली आहे़