धुळे जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:22 PM2020-08-11T12:22:26+5:302020-08-11T12:22:47+5:30
जुलै ते डिसेंबरपर्यंत २१८ ग्रामपंचायतींची संपते आहे मुदत
आॅनलाइन लोकमत
धुळे :१५ आॅगस्टपर्यंत मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. यात शिरपूर तालुक्यातील ९, शिंदखेडा तालुक्यातील ७ व साक्री तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीवर अद्याप प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
महाराष्टÑ ग्रामपंचायत अध्यादेश २०२० अन्वये महाराष्टÑ ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १५१ मधील कलम (१) मध्ये खंड (क) मध्ये जर नैसर्गिक आपत्ती किंवा आणिबाणी, प्रशासकीय अडचणी, महामारी, आदींमुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य होत नसेल तर शासनास पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल अशी तरतूद आहे. जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तींची निवड करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेला आहे.
धुळे जिल्ह्यात एकूण ५४१ ग्रामपंचायती आहेत. त्यात डिसेंबर अखेरपर्यंत २१८ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे मुदत संपणाºया जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी आज प्रशासकाची नियुक्ती केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे.
या विस्तार अधिकाऱ्यांची केली नियुक्ती
तालुकानिहाय ग्रामपंचायती व त्यावर नियुक्त प्रशासक असे-शिंदखेडा तालुका : दत्ताणे- शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.बी.घुगे, डांगुर्णे/सोंडले-विस्तार अधिकारी (कृषी) वाय.पी.गिरासे, जातोडा-विस्तार अधिकारी एस. एच. मोरे, कर्ले-शिक्षण विस्तार अधिकारी डी.एस. सोनवणे, निरगुडी-विस्तार अधिकारी एस.के. सावकारे, वरूळ/घुसरे-विस्तार अधिकारी एस.ओ जाधव, जसाणे- विस्तार अधिकारी जी.डी.देवरे.
शिरपूर तालुका : कुवे- एस.एस. पवार, घोडसगाव-वाय.एस.पाटील,चाकडू- व्ही.पी.राठोड, बाळदे-जी.पी.कुमावत, वाठोडे-वाय.एस.पाटील, नटवाडे-आर.झेड.मोरे, बाभुळदे-आर.के.गायकवाड, हिंगोणी बु.- एन.एम. सोनवणे, होळ-वैभव सोनार.
साक्री तालुका :फाफोदे व मौजे भागापूर- जे.पी.खाडे.