शेतजमीन वाटणीच्या वादातून हाणामारी! पुतण्याला मारहाण; ८ जणांवर गुन्हा
By अतुल जोशी | Published: July 17, 2023 06:15 PM2023-07-17T18:15:10+5:302023-07-17T18:15:32+5:30
शेती वाटणीच्या कारणावरून चिंचखेडा येथील चार जणांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
धुळे: तालुक्यातील सावळी गावात शेती वाटणीच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील साहेबराव लक्ष्मण मराठे या शेतकऱ्याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चिंचखेडा येथील काही जणांनी संगनमत करून शेती वाटणीच्या कारणावरून वाद घातला. यात एकाने त्याच्या हातातील पावडीने डोक्यावर मारल्याने डोके फुटले. विनोद मराठे याच्या पायाला मारल्याने तो जखमी झाला. या फिर्यादीवरून चार संशयितांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.
तर दुसऱ्या गटाकडून गोरख हिरामण मराठे फिर्याद दाखल केली. शेती वाटणीच्या कारणावरून चिंचखेडा येथील चार जणांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात लोखंडी सळईने डाेक्यावर वार केल्याने गोरख मराठे यांना गंभीर दुखापत झाली. तसेच पुतण्या अविनाश यालाही मारहाण करून जखमी करण्यात आले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.