चार महिन्यात जगविली तब्बल १०० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 04:11 PM2019-04-10T16:11:40+5:302019-04-10T16:12:38+5:30
शिंदखेडा : शहरातील तरुणांनी घेतली पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी
शिंदखेडा : शहरातील विरदेल रोडवरील तरुण स्वत:च्या आरोग्यासाठी सकाळी विरदेलरोडवर पायी फिरण्यासाठी येतांना सोबत पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात व त्यांनी लावलेल्या झाडांना ते पाणी घालतात. या तरुणांनी रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली सुमारे दीड कि.मी. अंतरावरील ९० ते १०० झाडे जगविली आहेत. हा त्यांचा उपक्रम गेल्या ४ महिन्यांपासून नित्यनेमाने सुरू आहे.
या तरुणांनी नुसती झाडेच लावली नाही तर त्याची निगाही ते राखत आहेत. स्वत:चे आरोग्य सांभाळत पर्यावरण संवर्धनाचे कामही हे तरुण करत असून त्यांच्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे. तसेच हा उपक्रम इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे.
शहराला जोडणाऱ्या ५ ते ६ रस्त्यावर सकाळी व सायंकाळी सुमारे हजारावर नागरिक पायी फिरण्यासाठी जातात. प्रत्येकाने एक जरी झाड जगवले तर एका वर्षात शहराच्या आजूबाजूला एक हजार झाडे दिसतील. त्यासाठी या तरुणांचा आदर्श घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
शिंदखेडा ते विरदेल हा रस्ता चौपदरी होत असल्याने या रस्त्यावरील सुमारे शंभर ते दीडशे वर्षे जुनी मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्यामुळे हा रस्ता झाडे नसल्याने भकास दिसत आहे.
यासाठी येथील योगेश बोरसे यांनी त्यांचे मित्र जीवन देशमुख, रोहित कौठळकर, बबलू मराठे, भूषण फौजी आदींच्या मदतीने दररोज सकाळी या रस्त्यावर आरोग्यासाठी पायी फिरण्यास जात असताना या रस्त्यावर झाडे लावण्याचे ठरवले. आणि ते जेवढे अंतर पायी चालत जातात, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दीड कि.मी. अंतरात त्यांनी ७५ ते १०० झाडे लावली. नुसते झाडे लावून न थांबता हे तरुण गेल्या ४ महिन्यापासून नित्यनेमाने फिरण्यासाठी जातांना सोबत घरून पाण्याने भरलेला ड्रम घेऊन जातात. आणि त्या झाडांना पाणीही घालतात.
यामुळे या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. यासाठी सुरुवातीस या तरुणांनी शहरातील प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन प्लास्टिकच्या बाटल्या जमा केल्या. आणि प्रत्येक झाडाला एक बाटली लावून त्यातून पाणी देत होते. मात्र, त्यांच्या या बाटल्या दररोज भंगार विकणारे उचलून नेत. मग त्यांनी घरूनच पाणी आणून झाडांना देण्यास सुरुवात केल्याने आता दीड कि.मी. अंतरावरील झाडांची चांगली ४ ते ५ फुटापर्यंत वाढ झाली आहे. अन्य पायी फिरणाऱ्यांनीही त्यांचा आदर्श घेतल्यास शहरात येणारा प्रत्येक रस्ता हा भविष्यात वृक्षराजींनी फुललेला दिसेल, यात शंकाच नाही. फक्त गरज आहे ती प्रेरणेची.