उभ्या पिकावर शेतकऱ्यानं फिरवला ट्रॅक्टर; लागवडीचा खर्चही न निघाल्यानं नैराश्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2024 04:56 PM2024-01-08T16:56:34+5:302024-01-08T16:57:04+5:30
धनूर येथील ज्ञानेश्वर तुकाराम (चौधरी) माळी यांनी तब्बल ६ एकर क्षेत्रात सहा हजार पपईच्या झाडांची मागील एप्रिल महिन्यात लागवड केली होती.
दीपक पाटील
कापडणे (धुळे) : कापडणे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात पपईची लागवड केलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पपईचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत आहे. परंतु गेल्या महिन्याभरापासून पपईचे दर कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने, धनूर येथील शेतकऱ्याने आपल्या शेतातील सहा एकर क्षेत्रातील पपई पिकावर रोटाव्हेटर फिरविला.
धनूर येथील ज्ञानेश्वर तुकाराम (चौधरी) माळी यांनी तब्बल ६ एकर क्षेत्रात सहा हजार पपईच्या झाडांची मागील एप्रिल महिन्यात लागवड केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून पपईचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. परंतु सध्या पपईला केवळ १ ते २ रुपये किलोचा भाव मिळत आहे. यातून लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. दरवर्षी चौधरी यांना पपई लागवडीतून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
ज्ञानेश्वर चौधरी यांना पपई लागवडीसाठी चार लाख खर्च आलेला आहे. मात्र भाव घसरल्याने, दोन लाखांचे सुद्धा उत्पन्न येणार नाही. पपईला भाव नसल्यामुळे शेतकरी पपई तोडण्यास टाळाटाळ करत आहेत. पपई तोडण्यासाठी मजुरांना प्रत्येकी टनामागे साडेतीनशे रुपये मजुरी द्यावी लागते. तोडण्याची मजुरीदेखील निघत नाही. व्यापारी कमी दरात पपई खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने नैराश्यातून पपई पिकावर रोटाव्हेटर फिरविले आहे.