अष्टविनायक मंडळाने काढले पायदळी सोंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 11:32 AM2019-09-04T11:32:53+5:302019-09-04T11:34:10+5:30
पिंपळनेर : अभंग निरुपण स्पर्धा, महिला भजन, नाम जप, हरिपाठ उत्साहात
पिंपळनेर : श्री समर्थ सदगुरू खंडोजी महाराजांच्या १९१व्या अखंड श्री नामसप्ताह महोत्सवानिमित्त मंदिरात अभंग निरूपण स्पर्धा, महिला भजन, नाम जप, हरिपाठ सुरु असून भाविकांमध्ये उत्साह आहे. भाविक नाम सप्ताह महोत्सवाचा लाभ घेत आहेत.
८ व ९ सप्टेंबर रोजी श्री समर्थ सद्गुरुखंडोजी महाराज नाम सप्ताह यात्रा उत्सव होत असल्याने मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या यात्रा उत्सवात गावात सर्वत्र दिव्यांची व्यवस्था केली जात आहे. तसेच पालखी ज्या मार्गाने मार्गस्थ होते त्या रस्त्यांची दुरुस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने केली जात आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच यात्रेत पाळणेही थाटून तयार झाली आहेत.
पोलिस प्रशासनाच्या वतीने गावाच्या मुख्य बाजारपेठेत बसस्टँड परिसर, मंदिर परिसर येथे पोलीस तैनात केले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी यात्रा उत्सवातील तयारी सुरू केली आहे.
पालखी उत्सवानिमित्ताने मंदिर समितीतर्फे पंचक्रोशीतील भजनी मंडळांना आमंत्रित केले जात आहे. मंदिरात काकड आरतीसाठी महिला, पुरुषांची तसेच युवकांची मोठी गर्दी होत आहे.
पायदळी सोंग
तसेच या नामसप्ताह महोत्सवात धूम असते, ती पायदळी सोंगाची. यावेळी पायदळी सोंगामध्ये सर्वप्रथम अष्टविनायक गणेश मित्र मंडळाने गणपती व सरस्वतीचे पायदळी सोंग काढून सुरुवात केली. पायदळी सोंगामध्ये बाळगोपाळही सोंग काढण्याचा आनंद घेत आहे. तसेच यात्रा उत्सवात मराठा पाटील समाज व जागृती मित्रमंडळातर्फे सजीव वहन देखावा काढण्यात येणार आहे. सदर मंडळ तयारीला लागले आहेत.
४ रोजी सायंकाळी ४ वाजता निरूपण स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. तसेच रात्री हभप नितीन महाराज मुदावडकर कळवणकर यांचे कीर्तन होणार आहे.
अष्टविनायक गणेश मंडळाने काढलेले गणपती व सरस्वतीचे पायदळी सोंग