जुन्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला
By देवेंद्र पाठक | Published: January 29, 2024 06:06 PM2024-01-29T18:06:49+5:302024-01-29T18:06:59+5:30
चितोड रोडवरील घटना, पाच जणांवर गुन्हा
धुळे : होळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने हल्ला चढविणाऱ्या पाच जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चितोड रोडवरील रंगारी चाळीत असलेल्या हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आकाश उर्फ बाळू गजानन थोरात (वय २४, रा.रंगारीचाळ, चितोड रोड, धुळे) या तरुणाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, होळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून पाच जणांनी एकत्र येऊन आकाश थोरात याच्यावर प्राणघातक हल्ला केला. एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने गंभीर जखमी अवस्थेत थोरात याने घटनास्थळावरून पळ काढला. २८ नंबर शाळेकडे जाताना पाठीवर आणि पोटावर सपासप वार करण्यात आले आहे.
वार इतका जोरात बसला की, क्षणात आकाश खाली कोसळला. तो खाली पडताच, त्याला पकडत हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली. स्वत:ची सुटका करून अंधारातून आकाश हा दवाखान्याकडे पळाला. तेथे थांबून त्याने भाऊ राहुल याला फोन केला. त्यानंतर, गंभीर जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोरांनीही तिथून पळ काढला. थोड्याच वेळात एका रिक्षातून आकाश याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या आकाश थोरात याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात पाच हल्लेखाेरांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.