‘त्या’ बालकांना सर्वतोपरी सहकार्य करा-शासकीय यंत्रणेला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:56+5:302021-06-02T04:26:56+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठित जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षण गृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा विषय अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड १९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना वेळेत पूर्ण करावयाच्या आहेत.
तालुकानिहाय पथके गठित
कोविड १९ मुळे पालक गमावलेल्या बालकांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. त्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सहकार्य करावे. तसेच महिला व बालविकास विभागाने तालुकानिहाय पथके गठित करावीत. कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांचेही सहकार्य घ्यावे. अशा बालकांच्या संपर्कात राहत त्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होईल, अशी दक्षता घ्यावी. तसेच अशा बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून द्यावा.
दर साेमवारी आढावा बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी दुपारी चार वाजता कोविड १९ मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचा आढावा घेण्यात येईल. यावेळी अशी बालके व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जातील, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अशी बालके व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यात येईल, असे प्राधिकरणाचे सचिव डॉ. डोंगरे यांनी सांगितले. ॲड. दुसाने यांनी पालक गमावलेल्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद
या बैठकीला कोविड १९ मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसह त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्य उपस्थित होते. त्यांच्याशी जिल्हाधिकारी यादव यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले. तसेच अशी बालके व कुटुंबांसाठी दर सोमवारी आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बालकांसाठी हेल्पलाइन
दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना काही समस्या असल्यास त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, ८३०८९-९२२२२ (सकाळी ८ ते रात्री ८), ७४०००१५५१८(सकाळी ६ ते रात्री ८) येथे किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, धुळे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे (दूरध्वनी : ०२५६२- २२४७२९), अध्यक्ष, सदस्य, बालकल्याण समिती, धुळे, मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भदाणे यांनी केले आहे.