धुळ्यात बंदुकीचा धाक, मिरचीची पूड फेकून दोघांना लुटले

By देवेंद्र पाठक | Published: August 16, 2023 04:41 PM2023-08-16T16:41:22+5:302023-08-16T16:42:20+5:30

बंदुकीचा धाक दाखवत मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात फेकत मोबाइलसह रोख रक्कम असा २८ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला.

At gun point, they threw chilli powder in the dust and robbed both of them | धुळ्यात बंदुकीचा धाक, मिरचीची पूड फेकून दोघांना लुटले

धुळ्यात बंदुकीचा धाक, मिरचीची पूड फेकून दोघांना लुटले

googlenewsNext

धुळे : महिलेसह एक जण दोन वेगवेगळ्या मोटरसायकलीने मोराणे गावाकडे जात असताना पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. बंदुकीचा धाक दाखवत मिरचीची पूड त्यांच्या डोळ्यात फेकत मोबाइलसह रोख रक्कम असा २८ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी दुपारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

भीमा श्रीराम हिरे (वय ३५, रा. फुले कॉलनी, साक्री रोड) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भीमा हिरे आणि चंदना नाना अहिरे हे दोघे वेगवेगळ्या मोटरसायकलीने जवाहर सूत गिरणीकडून मोराणे गावाच्या दिशेने जात असताना मोराणे गावाच्या बसस्टॉपजवळ पाठीमागून ट्रीपल सीट आलेल्या तिघांनी अडविले. बंदुकीचा धाक दाखविला आणि दोघांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली.

शिवीगाळ करत खिशातील १ हजार रुपये रोख आणि ४ हजारांचा मोबाइल तसेच चंदना अहिरे यांच्या पर्समधून ३ हजाराची रोख रक्कम, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत धुळ्याच्या दिशेने पाेबारा केला. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर दोघांनी स्वत:ला सावरत रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर भीमा हिरे यांनी धुळे तालुका पोलिस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती कथन केली. याप्रकरणी मंगळवारी दुपारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ५०६, ३४ सह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पाेलिस उपनिरीक्षक आर. डी. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: At gun point, they threw chilli powder in the dust and robbed both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे