सरकारच्या धोरणांविरूध्द राष्ट्रवादी काँगे्रसची धुळयात हल्लाबोल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:15 PM2018-02-19T12:15:36+5:302018-02-19T12:19:13+5:30
सरकारचा पाठिंबा काढण्याच्या धमक्यांचे शिवसेनेचे शतक-सुनील तटकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्य सरकारचे धोरण सर्व बाबतीत कुचकामी ठरले असल्याने त्यांना जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळण करून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा देखावा करावा लागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली़ त्यानंतर सरकारी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे फागणे ते अमळनेर हल्लाबोल यात्रा काढण्यात आली़
शिवजयंतीनिमित्त फागणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर हल्लाबोल यात्रेस प्रारंभ झाला़ या यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ हे सहभागी झाले़ हल्लाबोल यात्रेला ढोलतांशाच्या गजरात फागणे येथून शुभारंभ झाला. ही यात्रा अमळनेरकडे मार्गस्थ झाली़ हल्लाबोल यात्रा व शिवजयंतीचे औचित्य साधत दुचाकींवर राष्ट्रवादीच्या झेंड्यासह भगवे ध्वज लावून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ तत्पूर्वी धुळयातील सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला़ तसेच शिवसेनेवरही त्यांनी हल्लाबोल केला़ उध्दव ठाकरे यांनी आतापर्यंत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्यांचे शतक केल्याचे ते म्हणाले़ विधानसभेत धर्मा पाटील आत्महत्या, भूसंपादनातील गोंधळ व अनुषंगिक विषय उपस्थित करणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले़ डॉ़ हेमंत देशमुख यांच्याविरूध्द दाखल गुन्ह्याच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले़