पैसे वाटपाच्या संशयावरुन हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:15 PM2018-12-08T18:15:48+5:302018-12-08T18:16:35+5:30
गोकर्ण सोसायटीतील घटना : लोकसंग्रामच्या कार्यकर्त्याविरुध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नकाणे रोडवरील गोकर्ण हौसिंग सोसायटीत येथील राहत्या घराच्या ओट्यावर बसून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटले जात असल्याच्या संशयावरुन चार ते पाच जणांनी दोन जणांवर चाकूने हल्ला केला़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला असून मारहाण करणारे लोकसंग्रामचे असल्याचे सांगण्यात येत आहे़
शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भटू गवते व त्यांचे मित्र मनोज मधुकर पाटील हे त्यांच्या राहत्या घराच्या ओट्यावर बसलेले होते़ मात्र, हे दोघे महापालिका निवडणुकीचे पैसे वाटत आहेत असा संशय घेवून संशयित भूषण अशोक पाटील उर्फ बंटी पाटील व त्याच्या सोबत चार साथीदारांनी या दोघांवर हल्ला केला़ संशयितांनी चाकू काढून भटू गवते याच्या डोक्याच्या खाली, छातीवर दोन्ही बाजुला वार करुन दुखापत केली़ तसेच गवते यांच्या खिशातून ७०० रुपये रोख, हातातील ९ ग्रॅमची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली़ मनोज मधुकर पाटील हे मध्यस्थी करण्यास गेले असता त्यांच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला़ हल्ला करुन मारेकरी वाहनात बसून पळून गेले़ घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ पाटील आदींनी रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली़ जखमींची विचारपूस केली़ याप्रकरणी भटू गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित भूषण अशोक पाटील उर्फ बंटी पाटील (३४) याच्यासह चार जणांविरुध्द भादंवि कलम ३०७, ३९५, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली़ उपनिरीक्षक तिगोटे तपास करीत आहे़