चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला; आंबेडकरी समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 04:00 PM2023-06-29T16:00:51+5:302023-06-29T16:01:31+5:30
चंद्रशेखर यांना देवबंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमध्ये भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी चंद्रशेखर यांच्या शरीराला स्पर्श करुन गेली. चंद्रशेखर आझाद हे देवबंदला १ केव्हीमध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. हा गोळीबार झाला तेव्हा हल्लेखोर डिझायर कारमध्ये होते, असे सांगण्यात येत आहे. चंद्रशेखर यांना देवबंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी चे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंबेडकरी अनुयायी तसेच विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन मोदी सरकार व योगी सरकारचा निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते बाल बाल बचावले. जीवघेणा हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच चंद्रशेखर आझाद यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आझाद समाज पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष आनंद लोंढे, शंखर खरात, विशाल पगारे, संजय चव्हाण, भैय्यासाहेब पारेराव, किरण गायकवाड, अरविंद निकम, आनंद सैंगदाने, दिनेश निकुम, संजय अहिरे, महेंद्र शिरसाठ, राहुल वाघ, ॲड. संतोष जाधव, योगेश जगताप तसेच आंबेडकरी अनुयायांसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.