अपर तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:21 PM2020-01-04T22:21:47+5:302020-01-04T22:22:07+5:30
पांझरा नदी पात्र : पोलिसांच्या सतर्कमुळे दुर्घटना टळली
धुळे : शहरातील पांझरा नदीपात्रातून वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या अपर तहसीलदार व पथकावर दगड, काठ्यांनी हल्ला चढविण्यात आला़ पण, पोलिसांच्या सतर्कमुळे माफियांचा मनसुबा हाणून पाडण्यात आला़ जमलेल्या त्या जमावाला पांगविण्यात आले़ तहसीलदारांनी १० ब्रास वाळू आणि अन्य साहित्य जप्त केले आहे़ दुपारपासून सुरु झालेली ही कारवाई सायंकाळपर्यंत सुरु होती़ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होता़
गेल्या दोन ते महिन्यांपुर्वी दमदार पाऊस झाला होता़ पश्चिम पट्यात पावसाचा जोर असल्यामुळे सर्वच धरणे तुडूंब भरले होते़ ४० ते ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच पांझरेला महापूर आला होता़ त्यात वाळू देखील मोठ्या प्रमाणावर वाहून आली होती़ साहजिकच वाळू माफियांचे याकडे लक्ष गेले आणि पांझरेतून वाळूची तस्करी सुरु झाली़ यापुर्वी दोन ते तीन वेळा अपर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने वाळू माफियांवर कारवाईचे अस्त्र उगारले होते़ धुळे तालुक्यातील वार-कुंडाणे शिवारात देखील वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाला होता़
ही घटना तशी ताजी असतानाच पांझरा नदीपात्रातून सर्रासपणे वाळूची चोरीची होत असल्याची गोपनीय माहिती अपर तहसीलदार संजय शिंदे यांना मिळाली़ मिळालेल्या माहितीच्या आधारे अपर तहसीलदार शिंदे आणि त्यांच्या पथकाने पांझरा नदीपात्र गाठले़ तत्पुर्वी याबाबतची माहिती प्रांताधिकारी दराडे यांना देण्यात आली होती़ पांझरा नदीपात्रात कारवाईच्यावेळी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याची खबरदारी घेत पथकाने पोलिसांनाही बोलावून घेतले होते़ पथक पांझरा नदीत गेल्यावर आपल्यावर कारवाई होईल या भीतीने वाळू चोरांकडून अपर तहसीलदार आणि पथकावर दगडांचा वर्षाव करण्यात आला़ शिवाय काठ्याही उगारण्यात आल्या़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ तणाव वाढत असल्याचे समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, देवपूर पोलीस निरीक्षक संजय सानप, पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक कुबेर चवरे, शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्यासह अन्य अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने हल्लेखोर वाळू माफियांनी पळ काढला़ त्यांना पकडण्यासाठी पोलीस देखील त्यांच्यामागे धावले होते़ पण, एकही त्यांच्या हाती सापडला नाही़ अपर तहसीलदारांनी वाळू उपसा करणारी साधनसामुग्रीसह १० ब्रास वाळू जप्त केली आहे़ सायंकाळ होत असल्यामुळे काही वाळू जागेवरच पसरुन देण्यात आली होती़
पांझरा नदीपात्रातून कोणीही वाळूची चोरी करु नये यासाठी पोलिसांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत़ वाळूची चोरी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील सांगण्यात आले आहे़ कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसून केवळ १० ब्रास वाळू व काही साधनसामुग्री जप्त केली आहे़
- संजय शिंदे, अपर तहसीलदार, धुळे