पोलिस प्रशासनाचा प्रयत्न : नाविण्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद, संवेदनशील भागाकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:21 PM2017-09-18T12:21:51+5:302017-09-18T12:24:12+5:30
सीसीटीव्ही कॅमेराची अद्यापही प्रतीक्षा!
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी १ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी दिली होती़ तो प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला़ मात्र दोन वर्ष उलटूनही प्रस्ताव गृहविभागाकडे पडुन आहे़ गृह विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडून जीआर काढण्यात येईल़ त्यानंतर अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका पोलिस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी व्यक्त केली आहे़
शहरात ६ पोलीस ठाणे आहे़ त्यात शहर अतिसंवेदनशील म्हणूून ओळखले जाते़ धुळे शहरात किरकोळ कारणाचेही पर्यवसान दंगल, दगडफेकीत होते़ अशाच काही कारणावरून २००८ व २०१३ मध्ये शहरात दोन गटांत दंगल घडली होती़ त्यात जीवित व वित्त हानी झाली होती़ तसेच जिल्ह्यात विविध सणोत्सव उत्साहात साजरे होत असतात़ अशा वेळी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत असतात़ अशा वेळी काही कारणावरून वाद झाला तर त्याचे हाणामारीत रूपांतर होते़ त्यामुळे नागरिकांची धावपळ होते़ अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ तो निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे़ तसे झाल्यास गुन्हेगारांवर जरब बसविणे शक्य होणार आहे़ अशा विश्वासही पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे़ तसेच चोरी, चेनस्रॅचिंग, महिलांची छेड, हाणामारीच्या घटना रोखण्यासही पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत होणार आहे़
जिल्हा नियोजन व विकास समितीअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस विभागाने जिल्हाधिकाºयांना १५ जून २०१४ रोजी दिला होता़ मात्र तो अनेक महिने पडून होता़ त्यानंतर नव्याने रूजु झालेले जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी मे महिन्यात शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी १ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली़ मात्र गृह विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झालेले नाही़ हा प्रस्ताव गृहविभागाकडे पडून आहे़ सदर पत्र प्राप्त होताच शहरातील मुख्य चौक, रस्ते व संवेदनशील भागांचे सर्व्हेक्षण करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत़ शिवाय या कॅमेºयांचे फुटेज पाहण्यासाठी २४ तास कंट्रोल रूमही सुरू केला जाणार आहे़
शहरतील सर्व्हेक्षणानंतर सीसीटीव्हींच्या संख्येबाबत निर्णय घेतला जाणार आहेत़ दरम्यान, शासनाकडून जीआर प्रसिध्द झाल्यानंतर अंमलबजावणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले़ हा प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा असल्याचे एम़ रामकुमार म्हणाले़
शहरासह ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी राज्याच्या गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे़ शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतरच पुर्तता केली जाईल़ - एम़ रामकुमार, पोलीस अधीक्षक़