‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत मंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
By चंद्रकांत भगवान सोनार | Published: September 30, 2022 11:04 PM2022-09-30T23:04:59+5:302022-09-30T23:05:31+5:30
या आंदोलनामुळे सुरत नागपूर महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
धुळे : शहरातील सैनिक लॅान्स येथे शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील शुक्रवारी सायंकाळी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.
सुरत- नागपूर महामार्गावरील कृषी महाविद्यालयाजवळ मंत्री गुलाबराव पाटील यांचे वाहन अडविण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील आदींनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत उभे होते. या आंदोलनाची माहिती पोलिसांनी मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली.
या आंदोलनामुळे सुरत नागपूर महामार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. या आंदोलनात जिल्हा समन्वयक कैलास पाटील, नाना वाघ, विनोद जगताप, पुरुषोत्तम जाधव संजय जवराज, संदिप सुर्यवंशी, प्रविण साळवे, शरद गोसावी, मच्छिंद्र निकम, आबा भडागे, भैय्यासाहेब बागुल, छोटुभाऊ माळी, देवराम माळी, भटू गवळी, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, सुनिल चौधरी, कैलास मराठे, आबा हरळ, अजय चौधरी, दीपक गोरे आदी सहभागी झाले होते.