बंदमध्ये धुळे जिल्ह्यातील ६० खाजगी इंग्रजी शाळा सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 06:35 PM2019-02-25T18:35:48+5:302019-02-25T18:37:59+5:30
जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन, शाळांमध्ये सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणी
आॅनलाइन लोकमत
धुळे : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खाजगी इंग्रजी शाळा असोसिएशनतर्फे एकदिवसीय शाळा बंदचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हयातील ६० खाजगी इंग्रजी शाळा सहभागी झाल्या होत्या अशी माहिती सुरेश कुंदणाणी यांनी दिली.दरम्यान संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी गोविंद दाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईसा संघटना गेल्या ५-६ वर्षांपासून इंग्रजी शाळांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत आहे. इंग्रजी शाळेच्या समस्यांबद्दल अनेकवेळा शासन दरबारी वेगवेगळ्या माध्यमातून निवेदन देण्यात आली. मात्र शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव संघटनेला इंग्रजी शाळाना राज्यव्यापी बंद आंदोलन पुकारावे लागले. जिल्ह्यातील ६० शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या .निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या अशा-
१ नोव्हेंबर २०१८ चा शासन निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा. वर्ष २०१२ ते २०१९ पर्यंत आरटीई २५ टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा अदा करावा
राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा
१८ नोव्हेंबर २०१३च्या शासन आदेशामध्ये दुरूस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतूक संदर्भामध्ये मुख्याध्यापकाऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपविण्यात यावी
सर्व अर्थसहायीत तत्वांवर वाढ प्रस्तावांसाठी आॅनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी या मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी सुरेश कुंदणाणी, हर्ष रेलन, कुणाल सुराणा, हेमंत गर्दे, लता शहा, केतन गोसर, दीपक मेहता आदी उपस्थित होते.