धुळ्याच्या ट्रक टर्मिनसमधील गाळ्यांचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:22 AM2017-11-26T11:22:34+5:302017-11-26T11:23:37+5:30
महापालिका : २० वर्षांपासून रखडलेला प्रश्न लागणार मार्गी, बाजारभावाने करणार लिलाव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेतील सर्वात जुना प्रलंबित विषय असलेल्या व प्रचंड अडचणीतून निर्माण करण्यात आलेल्या ट्रक टर्मिनसचा प्रश्न अखेर मार्गी लावला जाणार आहे़ ट्रक टर्मिनससाठी बांधण्यात आलेल्या ३० गाळयांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मंगळवारी आयोजित महासभेत घेतला जाणार आहे़
धुळे शहर एकात्मिक विकास योजनेतंर्गत १०० टक्के शासन अनुदानातून मनपा मालकीच्या गट क्रमांक १४७/१४९ च्या एकूण ४़६० हेक्टर जागेत तब्बल १५ ते २० वर्षांच्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचा सामना करीत ३० गाळयांचे बांधकाम करण्यात आले़ या कामाची अंदाजपत्रकीय किंमत १ कोटी ३४ लाख इतकी असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या वर्षभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते़ मनपाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीकडूनही ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव मार्गी लावल्यास मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते़ राष्ट्रीय महामार्ग ३ पासून ट्रक टर्मिनस पावेतोचे रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे़
शहरात दोन ते अडीच हजारावर लहान मोठे मालवाहू वाहने आहे. त्यातील १ हजार वाहने ही नेहमी बाहेर असतात. उर्वरित एक ते दीड हजार वाहने शहरात माल भरून शहरातील चाळीसगाव रोड, ऐंशीफुटीरोड, पारोळारोड, बाजार समिती परिसर, सुशी नाला पुल आदींसह जिथे माल भरला तेथे वाहने विनापरवानगी उभे केली जातात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी असतांनाही सर्रासपणे अवजड वाहनांची ये-जा सुरू असते़ त्यामुळे मनपाने गाळयांच्या लिलावाचा निर्णय घेतला असला तरी प्रतिसादाबाबत साशंकता आहे़