तीस जणांच्या अहवालाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:04 PM2020-04-27T17:04:16+5:302020-04-27T17:07:47+5:30
मनपातर्फे उपाय योजना : सोमवारी सायंकाळी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता
धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची वाढत जाणारी संख्या चिंताजनक आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २४ वर पोहचलेली असून यात सर्वाधिक रूग्ण धुळे शहरात आहेत. दरम्यान कोरोनाची चाचणी घेतलेल्या ३० जणांच्या अहवालाची अजुनही प्रतीक्षा आहे. यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिलेली आहे.
शनिवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. रविवारी सायंकाळी मच्छिबाजार परिसरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, रूग्णसंख्या पूर्वीएवढीच २४ झालेली आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून रविवारचे १५ व सोमवारी १५ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. यात १२ जण हे शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथील कोरोनाबाधित वृद्धेच्या संपर्कात आलेले आहेत. तर काहीजण हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. हे ३० अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त होतील असा अंदाज आहे.
कोरानाने आता शहराची हद्द ओलांडून उपनगरातही प्रवेश केलेला आहे. मोहाडी उपनगरातील समाधाननगरातील महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या परिसरात फवारणी करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेतर्फे शहरातील हॉटस्पॉट भागात नियमित फवारणी सुरू आहे.