अत्याचार थांबविण्यासाठी हवे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:03 PM2020-01-02T22:03:21+5:302020-01-02T22:03:48+5:30
रसिका निकुंभ : महिला सुरक्षा विषयावर केले प्रबोधन
धुळे : ााध्यमांमध्ये समाज बदलाची ताकद आहे. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेत सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन करावे, असे प्रतिपादन अॅड़ रसिका निकुंभ यांनी गुरुवारी कार्यशाळेत व्यक्त केले़
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभाग धुळे, जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सुरक्षा आणि सायबर कायदे, पोलिस यंत्रणा आणि वृत्तांकन’ याविषयावर विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मुख्य सभागृहात पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परीविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड, सदस्य पितांबर महाले, प्रा. अनिल दामोदर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा रावळ आदी उपस्थित होते.
अॅड़ निकुंभ म्हणाल्या, महिलांची सुरक्षा हा विषय अत्यंत संवेदनशील असून यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, मानसिकता माध्यमांनी जनजागृती करीत बदलावी. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न झाले पाहिजेत. जेणेकरुन सामाजिक चित्र बदलण्यास मदत होईल. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथके, मोबाईल अॅप, हेल्पलाइन क्रमांक असून स्व-संरक्षणासाठी महिलांनी सक्षम झाले पाहिजे. तसेच समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा, असेही त्यांनी सांगितले.
बोडके म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आहेत. हेल्पलाइनच्या माध्यमातून महिलांना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते. माध्यमांनी महिला विषयक कायद्यांची माहिती उपलब्ध करुन दिल्यास महिलांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल़ छाजेड म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना होत आहेत. अलिकडे महिला स्व- संरक्षणाबाबत जागरूक झाल्या आहेत. पत्रकार सुनील पाटील म्हणाले, धुळे जिल्ह्यातील पत्रकारिता प्रगल्भ आहे. समाजात चुकीचा संदेश जाणार नाही याची नेहमीच दक्षता घेतली जाते. तसेच जिल्ह्यातील माध्यमांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असेही सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख प्रा. प्रवीण सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परीविक्षा अधिकारी श्री. बागूल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, महिला व बालकल्याण विभागाच्या अर्चना पाटील, मनोहर पाटील, चैतन्य मोरे, भूषण सोनवणे, अरुण वंजारी आदींनी परिश्रम घेतले.