बबन झोटे यांचा आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 07:13 PM2018-09-12T19:13:29+5:302018-09-12T19:16:25+5:30
धुळे महापालिका, सेवेत सामावून घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तत्कालिन नगरपालिकेच्या सेवेतून कमी करण्यात आलेले कर्मचारी बबन झोटे यांनी १९८९ च्या भरती प्रक्रियेच्या सीआयडी चौकशीसह सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी मनपा प्रवेशव्दाराजवळ सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू केले होते़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी झोटे यांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ त्यानंतर त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले़
बबन झोटे यांनी सोमवारपासून महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ आमरण उपोषण सुरू केले होते़ दरम्यान, मंगळवारी पोलीसांनी त्यांना जेलरोडवर क्युमाईन क्लबजवळ आंदोलनासाठी जागा दिली़ परंतु झोटे यांनी पुन्हा महापालिका गाठत आंदोलन सुरू केले होते़ बुधवारीही त्यांचे आंदोलन सुरू होते़ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बबन झोटे यांनी आयुक्त दालनाच्या बाहेर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले़ परंतु प्रशासनाकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले़ आयुक्त उपस्थित नसल्याने झोटे यांनी सहायक आयुक्त शांताराम गोसावी यांची भेट घेतली़ तोपर्यंत पोलीसांना त्याबाबतची माहिती देण्यात आल्याने पोलीसांनी महापालिकेत येऊन बबन झोटे, लक्ष्मी वसावे व निर्मला अहिरे यांना ताब्यात घेतले़ दरम्यान, बबन झोटे, लक्ष्मी वसावे व निर्मला अहिरे हे महापालिकेसमोर आंदोलनास बसलेले असतांना मंगळवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांना उपोषणास का बसले अशी विचारणा करून शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद लक्ष्मी वसावे यांनी शहर पोलीसात दिली़