धुळ्यात बॅक आॅफ बडोदा बॅँकेचे कामकाज तीन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:27 PM2018-02-09T21:27:36+5:302018-02-09T21:28:26+5:30
मनपा : थकबाकीदार मालमत्तांची किंमत निश्चित झाल्यावर होणार लिलाव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांकडून वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करून धडक मोहीम सुरू केली आहे. गल्ली क्रमांक ५ येथील बॅँक आॅफ बडोदाच्या इमारतीची थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी बॅँकेला सील लावले. या कारवाईनंतर संबंधित इमारतीच्या मालकाने थकबाकीची पूर्ण रक्कम प्रशासनाकडे जमा केली. त्यानंतर हे सील काढण्यात आले. बॅँकेला सील लावल्यामुळे तब्बल तीन तास बॅँकेचा व्यवहार ठप्प होता. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला.
थकबाकी वसुलीसाठी मनपाची यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ताधारकांकडून वसुली करण्यासाठी तयार केलेल्या पथकात कर्मचाºयांसोबत अधिकाºयांचाही समावेश करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उपायुक्त अभिजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गल्ली क्रमांक ५ मधील बॅँक आॅफ बडोदाची शाखा सील केली. ही बॅँक भाड्याच्या खोलीत सुरू आहे. बॅँक सील केल्यामुळे ग्राहक बॅँकेच्या बाहेर ताटकळत होते. याबाबत बॅँक इमारतीचे मालक ज्योती किशोर रिजवानी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी दुपारी साडे बारा वाजता त्यांच्याकडे असलेली आठ लाखाची थकीत रक्कम जमा केल्यानंतर बॅँकेचे सील काढण्यात आले. त्यानंतर बॅँकेत व्यवहार सुरळीत सुरू झाले. पुढे मनपाच्या एका पथकाने रेल्वे स्टेशनरोडवरील एका गॅरेजरचे दुकान सील केले. संबंधिताकडे १ लाख ४६ हजार ८३९ रुपये थकले आहे. संबंधित गॅरेज चालकाचे नाव सुरेश राजाराम जडे आहे. तसेच वैभव नगरात शैलेश मदाने यांच्याकडून १ लाख ७१ हजार ३४३ रुपये पथकाने वसूल केले. यावेळी वसुली प्रमुख शिरीष जाधव, बळवंत रनाळकर, राजेंद्र ओगले आदी उपस्थित होते.
वसुलीसाठी शास्ती माफी अभय योजना
धुळे मनपा बाजार विभागाने मनपा हद्दीतील दुकाने, गाळे, आटे व जागा भाडे रक्कमेच्या बिलातील शास्ती रक्कमेसाठी अभय योजना लागू केली आहे. त्यात ८ फेब्रुवारी ते ९ मार्च २०१८ पर्यंत भरणा केल्यास शास्ती रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येईल. तसेच १० मार्च ते २३ मार्चच्या आत भरणा केल्यास २५ टक्के सवलत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.