एकाच जागेवर उभ्या बसेसची दुरवस्था, सीट, टायर फाटले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:52+5:302021-06-02T04:26:52+5:30
गेल्यावर्षी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागल्यानंतर तब्बल साडेतीन महिने बससेवा बंद होती. त्यामुळे एकाच जागी उभ्या राहिल्याने अनेक बसगाड्यांची दुरवस्था ...
गेल्यावर्षी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागल्यानंतर तब्बल साडेतीन महिने बससेवा बंद होती. त्यामुळे एकाच जागी उभ्या राहिल्याने अनेक बसगाड्यांची दुरवस्था झालेली होती. ऑगस्टनंतर बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बससेवा सुसाट होती. रेल्वे बंद असल्याने, बसशिवाय पर्याय नव्हता. मात्र कोरोनाची दुसरी लाट आली. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे बससेवेला पुन्हा ‘ब्रेक’ लागला आहे. सध्या बस रस्त्यावर नसल्याने अपघात नाहीत. मात्र अनेक बसगाड्यांची दुरवस्था झालेली आहे. काचा फुटलेल्या, आरसे फुटलेले, आसनांची दुरवस्था झालेली दिसून आली.
धुळे आगारात उभ्या असलेल्या एका बसची समोरची कास फुटलेली आहे. तसेच चालकाच्या बाजूचा भागही तुटलेले होता. तसेच बसचे मडगार्डही लोंबकळत होते.
महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसचे आसनही तुटलेले दिसून आले. तसेच काही लाल गाड्यांमधील आसनही फाटलेले दिसून आले.
अनेक दिवसांपासून आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांच्या टायरचीही दुरवस्था झालेली आहे. अनेक गाड्यांचे टायर फाटू लागल्याची स्थिती आहे.
एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाते. आजही अनेकजण बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. जागच्या जागीच उभी असल्याने, सर्वच आगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच बसेसची झालेली दुरवस्था म्हणजे दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती आहे.
n गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्यामुळे २५ मार्चपासून ते १८ ऑगस्टपर्यंत एस.टी.ची आंतरजिल्हा वाहतूक बंद होती. आता पुन्हा २५ एप्रिलपासून बससेवा बंद आहे.
n गेल्या वर्षभरात फक्त तीन महिने एस.टी. सुरळीतपणे रस्त्यावर धावली आहे. एस.टी. आगारातच उभी असल्याने मोठा फटका बसत आहे.
n दरम्यान, आता एस.टी.ची सेवा काही प्रमाणात सुरू झालेली आहे. काही गावांसाठी दोन-तीन फेऱ्या होऊ लागल्या आहेत.
n कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर एस.टी. पुन्हा पूर्ण क्षमतेने धावेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.