शिंदखेडा येथे उद्या बालाजी महाराजांचा रथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:26 AM2019-10-12T11:26:40+5:302019-10-12T11:26:57+5:30
१४४ वर्षांची परंपरा, १४ रोजी पालखी सोहळा
आॅनलाइन लोकमत
शिंदखेडा : येथील सालाबादाप्रमाणे १४४ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी (दि.१३ आॅक्टोबर) दुपारी एक वाजता निघेल. तर पालखी सोहळा १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती बालाजी मंदिराचे मठाधीपती मेघशाम बुवा यांनी दिली .
सकाळी श्री लक्ष्मी व्यंकटेशाला रुद्र अभिषेक झाल्यानंतर सकाळी सुदर्शन चक्राची मिरवणूक पंचमंडळी भक्तगण यांचेसह निघत असते. सुदर्शन चक्र मस्तकी धरून मंगलवाद्य सह श्रींच्या नामघोषात व रथ मार्गाने मिरवत घेऊन येण्याचा परंपरागत मान गिरासे घराण्यातील मधुकर गिरासे यांचेकडे असतो. लक्ष्मी व्यंकटेश रथावर आरूढ होण्यापूर्वी श्रीराम बालाजी मंदिरात मंगल वाद्यासह रथावरील ब्रह्मवृंद, पंचमंडळी, भक्तगणांच्या समवेत आरती होते. आरतीचा मान परंपरागत राउळ घराण्याकडे असून हिम्मतसिंह भिमसिंह राउळ यांचे हस्ते आरती होते. मठाधीपती मेघश्याम बुवा यांचे हस्ते आरती होऊन रथ मिरवणुकीस प्रारंभ होतो. बालाजी महाराज की जय च्या नामघोषाने परिसर दुमदुमून जातो. या रथोत्सवासाठी परिसरातील व बाहेरील भक्तगण रथ ओढतात.रथास मोगरी लावणारी सेवेकरी मंडळी कुशलतेने मोगरी लाऊन रथ काबूत ठेवण्याचे धैर्य करीत असतात .
सोमवारी पालखी सोहळा
१४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम बालाजी मंदिरातून लक्ष्मी व्यंकटेशाची पालखीतून मिरवणूक निघत असते. पालखी धरून नेण्याचा मांन भोई समाज बांधवांचा असतो. या सोहळ्यात गावातील व जिल्ह्यातील भजनी मंडळी भजनात सहभागी होतात. त्याचबरोबर या पालखी सोहळ्यात विविध वेशभूषा करून नृत्य सादर करणारे कलोपासक सहभागी होतात. या ठिकाणी होणारी फटाक्यांची आतिषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. विविध नाविन्यपूर्ण ,भावपूर्ण ,उत्साहपूर्ण ,उत्सवाची सांगता अश्विन व द्वितीयेस लक्ष्मी व्यंकटेशाच्या अमृत स्नानानंतर लघुरुद्र अभिषेकाने होते.
देविदास देसले , हिमतसिह राऊळ, योगेश सिंपी, दिलीप चौधरी, श्रीराम चौधरी, उदय वानखेडे , जीवन भामरे आदी पंच मंडळ यांनी शहर व तालुका परिसरातील भाविकांनी रथउत्सवाचचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.