बालाजी रथोत्सवाला १३८ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 10:19 PM2019-10-09T22:19:30+5:302019-10-09T22:20:11+5:30
चैतन्य : भगवान बालाजींच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा सागर, ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
धुळे : ‘व्यंकट रमणा गोविंदा, लक्ष्मी रमणा गोविंदा’चा जयघोष करत शहरातील खोलगल्लीतील बालाजी मंदिरापासून बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली़ १३८ वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आहे़ या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़
सकाळी मूर्तीचा अभिषेक
दसरा सणाच्या दुसऱ्या दिवशी धुळ्यातील बालाजी रथोत्सवाला प्रारंभ केला जातो़ बुधवारी ९ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मूर्तीचा अभिषेक करण्यात आला़ अभिषेकानंतर दोन तास मूर्तीची पूजा सुरू होती़ नैवेद्य आरती करण्यात आली़ रथाच्या पहिल्या आरतीचा मान स्व़ बाबुलाल बालाराम अग्रवाल यांच्या परिवाराला देण्यात आला़ यावेळी कमलनयन अग्रवाल, मंगल अग्रवाल, मयुरेश अग्रवाल, कल्पेश अग्रवाल , वर्षा अग्रवाल, उज्वला अग्रवाल यांच्या हस्त रथाची आरती करून मिरवणूक काढण्यात आली़
पारंपरिक मार्ग कायम
साडेअकरा वाजेच्या सुमारास रथोत्सवाला सुरुवात झाली़ बालाजी मंदिरापासून निघालेला हा रथ पुढे चौथी गल्ली, सन्मान लॉजपर्यंत आलेला आहे़ पुढे हा रथ , राजकमल टॉकीज, आग्रा रोडवरून सरळ महात्मा गांधी पुतळामार्गे नगरपट्टी, सहावी गल्ली, मुंदडा मार्केटकडून गल्ली नंबर ४ मार्गे राममंदिराकडून बालाजी मंदिर असा मार्गस्थ होईल़ मिरवणूकीत मोर, सिंह, हत्ती, गरूड, शेषनाथ, विमान, सुर्य, चंद्रमा, मारूती, सप्तमुखी घोडा आदी वहनांचा समावेश करण्यात आला होता़ गुरूवारी विधीवत पुजा करून मिरवणूकीचा सकाळी समारोप करण्यात येईल़
चोख पोलिस बंदोबस्त
बालाजी रथोत्सव पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणे नागरिक दाखल होतात़ त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रथमार्गावरील चौका-चौकात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़
रुग्णसेवा कार्यरत
बालाजी रथोत्सवात सहभागी होणाºया नागरिकांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तातडीने उपचार व्हावा यासाठी रथोत्सवासोबतच रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली आहे़ यात अत्याधुनिक सुविधांसह पथक तैनात करण्यात आले होते़ दरम्यान, यावेळी भाविकांनी भगवान बालाजीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बालाजींचा जयघोष सुरु होता. तर प्रसादाची देखील व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती़