गोविंदाच्या जयघोषात बालाजींचा रथोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:32 PM2019-10-10T22:32:06+5:302019-10-10T22:32:24+5:30
भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडले : परंपरा कायम, धुळ्यात दुपारी रथ पोहचला मंदिरात
शिरपूर : शहरातील १४५ वर्षाची परंपरा असलेल्या वरच्या गावातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे काढण्यात आलेल्या रथोत्सवाला खानदेशातील बालाजी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ही रथोत्सव यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, धुळ्यातही रथोत्सव पार पडला़ रथ पारंपारीक मार्गावरुन फिरुन गुरुवारी दुपारी १२ वाजता मंदिरात पोहचला़
गुरुवारी, सकाळी रथोत्सवाची पूजा रथोत्सवाची महापूजा संत साहित्याचे अभ्यासक ह़भ़प़ डॉ़जयंत करंदीकर सोलापूरकर यांच्या हस्ते विविधत पूजा झाली़ यावेळी लेझीम मंडळ तसेच विविध मंडळांनी सहभाग घेतला. सुशोभित व विद्युत रोषणाईने सजविलेला रथ व त्याचबरोबर लेझींम, ढोल, बँन्ड यामुळे शोभा यात्रा आकर्षित ठरली. महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. मार्गावर ठिकठिकाणी भंडाराचा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बाळगोपाळांसह युवक-युवतीही रथ ओढत होते. घोषणांनी परिसर दुमदुमुन निघाला. बालाजीला प्रसाद म्हणून केळी वाहली जात होती. रथ मार्गक्रमण करीत असतांना घरोघरी बालाजी रथाची आरती केली गेली. रस्त्याच्या दुर्तफा नागरीकांनी गर्दी केली होती.