करपा रोगाच्या भितीने केळी-टोमॅटो उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:16 PM2019-12-04T22:16:51+5:302019-12-04T22:17:28+5:30
बभळाज परिसर : अवकाळी पाऊस; ढगाळ वातावरण; कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी
बभळाज : बभळाज परिसरात रविवार १ डिसेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजता अवकाळी पावसाचा शिडकावा झाला असून सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल होवून ढगाळ वातावरण झाले आहे. या वातावरणाचा केळी व टोमॅटो पिकांवर अतिशय प्रतिकूल परिणाम होणार असून या वातावरणात केळी व टोमॅटो पिकांवर ‘करपा’ रोग येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केळी व टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाºयानुसार येत्या ५ डिसेंबरपर्यंत असेच ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचीही शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार रविवारी पहाटे ३.४५ वाजता परिसरात पावसाने हजेरी लावली. वातावरणात अचानक झालेल्या या बदलाचा पिकांवर परिणाम होणार असला तरी या परिसरात मुख्यत्वेकरुन केळी व टोमॅटो पिकाचे मोठे क्षेत्र आहे. केळी पिकामध्ये नवती, खोडवा, तिडवा या प्रकारांचा समावेश आहे. नवती केळीची जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. त्यामुळे सदरचे पिक अधिक प्रमाणात पाच महिन्यांचे झाले आहे. तर खोडवा (दुरी), तिडवा (तिरी) या प्रकारातील केळी निसवाड झाली आहे किंवा निसवाड होत आहे. एकंदरीत केळी पिक उत्पादकांच्या दृष्टीने अगदी नाजूक टप्प्यावर आहे. त्याची जोपासना करणे गरजेचे आहे. मात्र रविवारपासून वातावरणात झालेला बदल व आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकावर परिणाम होणार आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास केळीच्या उत्पादनात प्रचंड घट होवून शेतकऱ्यांनी नुकसान होण्याची भिती व्यक्त केली आहे.
टोमॅटो पिकही लागवड करुन साधारणपणे एक महिना होत आहे. तर काही शेतकरी अद्याप लागवड करीत आहेत. बाल्यावस्थेतील या पिकाचेही रोगांपासून संरक्षण करणे शेतकºयांना अशा वातावरणात अवघड जाणार आहे. या पिकांवर जलद परिणाम करणारा व उशिराने परिणाम करणारा असे दोन प्रकारचे करपा रोग येत असतात. अशा खराब वातावरणामुळे जलद परिणाम करणारा करपा होण्याची दाट शक्यता असते. केळी पिकालाही मोठा झटका बसू शकतो, अशी प्रतिक्रिया बभळाज येथील शेतकरी जयपाल उदेसिंग राजपूत यांनी व्यक्त केली. या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास किंवा होवूच नये याकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने शेतकºयांना शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.