मालमत्ता कर थकवल्याने बॅंकेला ठोकले टाळे; महानगरपालिका वसुली विभागाची कारवाई
By भुषण चिंचोरे | Published: March 8, 2023 05:17 PM2023-03-08T17:17:55+5:302023-03-08T17:18:25+5:30
मालमत्ता कर थकवल्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्ली क्रमांक चार येथील इमारतीला महानगरपालिकेने टाळे ठोकले आहे.
धुळे : मालमत्ता कर थकवल्याने बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्ली क्रमांक चार येथील इमारतीला महानगरपालिकेने टाळे ठोकले आहे. एक कोटी १४ लाख ३६ हजार ६९२ रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या वसुली पथकाने बुधवारी ही कारवाई केली.
सदर इमारत राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असून त्यांनी ती बँक ऑफ महाराष्ट्राला भाड्याने दिली आहे. २०११ पासून बँकेकडे मालमत्ता कर थकीत असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहेे. मालमत्ता करात तडजोड करण्याबाबत जिल्हा न्याय विधी मंडळातर्फे बँकेला नोटीसही बजावली होती, पण तडजोडीस बँकेने नकार दिला होता. त्यामुळे महानगरपालिकेने पुन्हा नोटीस बजावली होती. मात्र कोणताही प्रतिसाद न दिल्याने महानगरपालिकेच्या वसुली पथकाने बँकेला बुधवारी टाळे ठाेकले. वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर वडनेरे, मुकेश अग्रवाल, सुनील गढरी, संजय शिंदे, अनिल सुडके, राजू गवळी, प्रदीप पाटील, अनिल जोशी, मधुकर पवार, अशोक मंगीडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.