बारीपाड्याचा विकास म्हणजे एकी, विश्वास व मेहनतीचे फळ : सरसंघचालक मोहन भागवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:55 PM2017-12-05T17:55:13+5:302017-12-05T17:58:39+5:30
ग्रामविकासातील पंचसूत्रीचा केला गौरव
आॅनलाईन लोकमत
धुळे : संपूर्ण जग एका नव्या दिशेच्या शोधात आहे. एकी, विश्वास आणि मेहनतीच्या बळावर परिवर्तन घडवून बारीपाडा गावाने विकासाची ही नवी दिशा निश्चित केली आहे. याच गावाचा आदर्श ठेऊन अन्य गावांमध्ये त्यादिशेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बारीपाडा गावाचा गौरव केला.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या बारीपाडा या छोट्याशा आदिवासी गावाने जल, जमीन, जंगल, जन आणि जानवर या ग्रामविकासातील पंचसूत्रीचा आधार घेऊन गेल्या २६ वर्षात आदर्श व स्वावलंबी ग्राम निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सरसंघचालक मंगळवारी बारीपाडा येथे आले होते.
बारीपाड्यातील सर्व ग्रामस्थांनी येऊन अथक परिश्रमाच्या बळावर गावात परिवर्तन घडवून आणल्याचे ऐकले होते. आज प्रत्यक्ष बारीपाड्याचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विविध प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाल्याबद्दल सरसंघचालकांनी समाधान व्यक्त केले.
डॉ.मोहन भागवत यांनी अतिशय सहज आणि सोप्या शब्दात ग्रामस्थांशी संवाद साधला. सरसंघचालक म्हणाले की, माणूस व त्याचे माणूसपण टिकून राहिले तर गाव चांगला राहतो, हे आपण सिध्द केले आहे. मात्र आहे त्यापेक्षाही आपल्याला गाव चांगला करायचा आहे. चांगुलपणाची ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. आज पैसा हे सर्वस्व झालेल्या जगात समाधानी वृत्तीने राहता येऊ शकते याबद्दल साºया जगाला अप्रूप वाटत असल्याने लोक नव्या दिशेच्या शोधात आहेत. ही दिशा बारीपाड्याने नक्की केली असल्याचे गौरवोदगार डॉ.मोहन भागवत यांनी काढले.
बारीपाड्यातील ग्रामस्थांनी घडवून आणलेल्या परिवर्तनाची कहाणी साºया देशभरात जाण्याची आवश्यकता आहे. हे परिवर्तन स्वत: अनुभवले असल्याने यापुढे जिथे जिथे संधी मिळेल, त्याठिकाणी बारीपाड्याच्या प्रयोगाबाबत मी माहिती देईल, असे आश्वासनही सरसंघचालकांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.मनीष सूर्यवंशी, लहानू चोधरी, विजय पवार व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. आनंद फाटक यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अभिमान पवार यांनी केली. बारीपाड्याच्या हितचिंतकांची एक बैठक झाली.
पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत
तत्पूर्वी सकाळी दहा वाजता डॉ. मोहनजी भागवत यांचे बारीपाडा गावात आगमन झाले. आगमन होताच पारंपारिक वनवासी नृत्य वाद्यांच्या साथीने सरसंघचालकांना ग्रामदर्शन घडविण्यात आले. बारीपाडा गावचे सरपंच अनिल पवार यांच्या निवासस्थानी गावातील भगिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.
बारीपाड्याच्या ग्रामस्थांनी गेल्या २६ वर्षांत राखलेले ११०० एकर जंगल हे तेथील एक वैशिष्ट्य बनले आहे. या जंगलाला देखील सरसंघचालकांनी भेट दिली. या जंगलातील विविध वृक्षांच्या प्रजाती, औषधी वनस्पती, वनभाज्या या बरोबरच ग्रामस्थांनी श्रमदानाने बांधलेले दगडी बंधारे, मातीचे बांध यांची देखील सविस्तर माहिती सरसंघचालकांनी ग्रामस्थांकडून घेतली. उजाड माळरानावर ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या जंगलाचे विहंगम दृश्य बघितल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्यमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित यांची यावेळी उपस्थिती होती. पाऊस असूनही ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.