तांत्रिक मंजुरीअभावी रस्त्यांच्या प्रस्तावाला ‘बे्रक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:16 PM2019-01-09T22:16:27+5:302019-01-09T22:16:50+5:30
महापालिका : नगरोत्थान योजनेत ७२ रस्त्यांसाठी १६२ कोटींचा होता प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेने २०१७ मध्ये ९२ रस्त्यांच्या कामांसाठी केलेला २०८ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाला सादरच केला नसल्याचे समोर आले होते़ दरम्यान, ७२ रस्त्यांसाठी १६२ कोटींचा सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी तो सध्या तांत्रिक मंजूरीअभावी रखडला आहे़
महापालिकेने २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते व गटारींच्या कामांचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करून शासनाला प्रस्ताव सादर करण्याबाबतचा ठराव २० फेब्रुवारी २०१७ च्या महासभेत केला होता़ त्यानुसार प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक बनविण्याचे काम नाशिक येथील निसर्ग कन्सलटन्सी या संस्थेला देण्यात आले होते़ या संस्थेने शहरातील ९२ रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे २०८ कोटी ९८ लाख ९८ हजार १३३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मनपाला सादर केले़ पण त्यात एलईडी पथदिव्यांचा समावेश होता़ दरम्यान, नंतर शासनाने एलईडीच्या संदर्भात सुधारीत आदेश काढले तर या प्रस्तावातील काही रस्त्यांची कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने ती अन्य निधीतून करून घेण्यात आली़ त्यामुळे सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आला़
सुधारीत प्रस्तावात ७२ रस्त्यांसाठी १६२ कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले़ परंतु तांत्रिक मंजूरीअभावी हा प्रस्ताव अजूनही शासनाला सादर करण्यात आलेला नाही़ अंदाजपत्रकात दर्शविण्यात आलेल्या कामांना तांत्रिक मंजूरी घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प व्यवस्थापन संस्थेचीच होती़
परंतु संबंधित संस्थेचे १२ लाख रूपयांचे बिल थकल्याने संस्थेकडून प्रस्ताव पाठविण्याबाबत चालढकल सुरू असून प्रशासनही उदासिन असल्याचे दिसून आले आहे़ पण असे असले तरी शासनाने महापालिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्याची चर्चाही मनपा आवारात होत आहे़