धुळ्यात वाहतुकीस अडथळा, १५ लोटगाड्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:48 PM2018-05-17T22:48:53+5:302018-05-17T22:48:53+5:30
वाहतूक शाखा : जेबी रोडसह भागात मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील वर्दळीच्या जेबी रोड, टॉवर बगिचा, गल्ली नंबर ४ या भागात गुरुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान अचानक वाहतूक शाखेने मोहीम राबविली़ कारवाई करत १५ जणांच्या लोटगाड्या जप्त करण्यात आल्या़
शहरातील आग्रा रोडवर महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील महिन्यात कारवाई करण्यात आली होती़ पण, त्याचा नंतरच्या कालावधीत काहीही फरक पडलेला नव्हता़ एरव्ही वाहतूक शाखेकडून वेळोवेळी हॉकर्सधारकांवर कारवाई केली जाते़ तेवढ्या पुरता रस्ता मोकळा होतो़ दंडात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा जैसे-थेच प्रकार होत असल्याने प्रशासनाने हॉकर्सधारकांपुढे हात टेकले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे़
यांनी केली कारवाई
अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, विलास परदेशी, नितीन अहिरराव, हरुण शेख, शांताराम जाधव, हसन शहा, यशवंत पाटील, दिनेश देवरे, श्याम काळे, ज्ञानेश्वर साळुंखे, चंद्रकांत पाटील, धनंजय गोरे, मुकेश वाघ, शशि देवरे, कुणाल साळवे, सय्यद अली सय्यद, पंकज शिंदे, अमोल भामरे यांनी कारवाई केली़
न्यायालयात पाठविले
गुरुवारी दुपारी वाहतूक शाखेने कारवाई केल्यानंतर ४ जणांना न्यायालयात पाठविण्यात आले होते़ त्यांना प्रत्येकी ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ उर्वरीत ११ जणांना शुक्रवारी न्यायालयात पाठविण्यात येणार आहे़ त्यांच्या लोटगाडी वाहतूक शाखेत आणून त्या जप्त केल्या आहेत़