पोलिसात तक्रार का दिली म्हणत पती-पत्नीला मारहाण
By देवेंद्र पाठक | Published: December 21, 2023 10:14 PM2023-12-21T22:14:08+5:302023-12-21T22:14:17+5:30
मोहाडी शिवारातील घटना, तीन जणांविरोधात गुन्हा
धुळे: पोलिस ठाण्यात तक्रार का दिली, असा जाब विचारत शिवीगाळ करत मोहाडी येथील तरुणाला लोखंडी रॉडसह हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तरुणाची पत्नी ही मध्यस्थी करण्यासाठी आली असता तिलाही मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. जखमी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी तीन जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मोहाडी उपनगरातील दंडेवाला बाबानगर भागात राहणाऱ्या तिघांनी याच भागात राहणाऱ्या दिलीप धाकू सोनवणे (वय ३२) या तरुणाचे घर गाठले. सुरुवातीला त्याला शिवीगाळ करत बाहेर बोलाविले. तो आल्यानंतर माझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून त्याला जाब विचारण्यात आला. यावेळी दोघा-तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. यावेळी तिघांपैकी एकाजवळ लोखंडी राॅड, तर एकाजवळ काठी होती.
वाद विकोपाला गेल्यानंतर दिलीप सोनवणे यांना मारहाण करण्यास सुरुवात झाली. आरडा ओरड झाल्याने दिलीप सोनवणे यांची पत्नी हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिलाही आलेल्या तिघांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. दोघांना जखमी केल्यानंतर या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर दिलीप सोनवणे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, बुधवारी दुपारी दोन वाजता दंडेवाला बाबानगरात राहणाऱ्या तीन जणांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस हेड कॉन्स्टेबल लोहार घटनेचा तपास करीत आहेत.