१० दिवसात झाला १८ तक्रारींचा तत्काळ निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:51 PM2020-01-05T22:51:00+5:302020-01-05T22:51:55+5:30
मनपा : अस्वच्छतेविषयक तक्रार सोडविण्यासाठी हेल्पलाईन
धुळे : शहरातील ओला- सुका कचरा संकलन करण्यासाठी गेल्या वर्षी ७९ घंटागाडया खेरदी करून स्वच्छतेची जबाबदारी नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला सोपविण्यात आली आहे़ मात्र कंपनीबाबत तक्रारी येत असल्याने कामात सुधारणा करण्याची तंंबी आयुक्तांकडून मिळाल्यानंतर कंपनीने तक्रार निवारण केद्र सुरू केले आहे़ दहा दिवसात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या १८ तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे़
महानगरपालिकेतर्फे कचरा संकलनाचा ठेका संपल्यानंतर कचरा संकलनासाठी नव्याने गेल्यावर्षी नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला १७ कोटी ७८ लाख १६ हजार ९१४ रूपयांचा ठेका तीन वर्षासाठी देण्यात आला आहे़ जुन्या ठेक्याची मुदत २० जानेवारी २०१९ रोजी संपल्यानंतर नव्याने देण्यात आलेल्या कंपनीकडून कचरा संकलनाचे काम सुरू केले होते़ कचरा संकलनासाठी महापालिकेने नव्याने खरेदी केलेल्या ७९ घंटागाड्या व इतर वाहने दिली आहेत. मात्र तरीही शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न सुटत नसल्याने मनपाकडून ठेकेदाराला १५ ते १६ नोटीसा बजावून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती़
तंबीनंतर सुधारणा
मनपाकडून करण्यात आलेल्या नियम अटीचे उल्लंघन, कामाकडे दुर्लक्ष तसेच अनियमिता असल्याने हा ठेका वादग्रस्त ठरू लागला आहे़ महासभेत नगरसेवकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून ठेकेदारास पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपासह ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती़आयुक्त अजिज शेख यांच्याकडून ठेकेदाराला देण्यात आलेल्या तंबी नंतर मनपात २७ डिसेंबर २०१९ पासून तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे़ गेल्या दहा दिवसात मोहाडी, मोगलाई, पाचकंदील, पेठ भाग, देवपूर अशा भागातील नागरिकांनी प्रभागातील चौकात, मोकळ्या जागेवरील अस्वच्छता, प्रभागात घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या़ त्यानुसार केंद्रात प्राप्त झालेल्या तक्रारींचे दहा निराकरण केले.
जीपीएस व इतर सुविधा देणार
तक्रारी सोडविण्यासाठी महिन्याभरात जीपीएस व करारनामात नमुद केलेल्या अटीशर्तीनुसार प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़