जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणीस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:43 PM2019-11-03T13:43:10+5:302019-11-03T13:43:49+5:30

शिंदखेडा तालुका : यावेळी होणार एक गट व दोन गणांची वाढ

Beginning of the march in Zilla Parishad | जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणीस सुरूवात

dhule

googlenewsNext

भिका पाटील।
शिंदखेडा : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले असून आपापल्या पक्ष नेत्यांकडे इच्छुकांनी खास दूतामार्फत मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात नवीन रचनेनुसार जि.प.चे १० गट व व पं.स.चे २० गण राहणार आहेत. या वर्षी गटाची निर्मिती करण्यात येऊन बाह्मणे गाव हे विखरण गटास जोडण्यात येऊन बाह्मणे गटातील धमाणे गणाला नवीन गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
जि. प. व पं.स. निवडणुकीत सेना-भाजपात युती तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचीही आघाडी होती. त्यात युतीत शिवसेनेला जि.प.च्या चार जागा व पं. स.च्या आठ जागा दिल्या होत्या. तर उर्वरित जागा भाजपाने लढवल्या होत्या. काँगेस, राष्ट्रवादी काँगेस आघाडीत काँग्रेस पाच,राष्ट्रवादी चार अश्या होत्या तर पसच्या नऊ नऊ जागा समान वाटप करून त्यावर आपले उमेदवार उभे केले होते त्यात राष्ट्रवादीचे फक्त प स च्या तीन जागेवर उमेदवार निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे सद्यस्थितीत ९ गट व १८ गण आहेत. त्यात गटात व गणात भाजपाचे वर्चस्व आहे. नऊपैकी नरडाणे, चिमठाणे, बाह्मणे, मालपूर या चार गटांत भाजपचे वर्चस्व आहे. तर खलाणे, मेथी व विरदेल या तीन गटात काँगेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तसेच विखरण गटात शिवसेना व बेटावद गटात अपक्ष उमेदवार आहे. पं.स. गणात बाह्मणे, विरदेल, वारूड, मेथी, शेवाडे, निमगुळ, हातनूर या गणांत भाजपाचे ७ उमेदवार निवडून आले आहेत तर काँग्रेसचे पाटण, वर्षी, खलाणे, वालखेडा या चार जागांवर उमेदवार निवडले होते. मात्र वर्षी गणातील सदस्या ह्या भाजपाच्या गोटात गेल्याने काँग्रेसकडे तीन पं.स. गण राहिले. राष्ट्रवादीच्या तिकिटावर नरडाणे, कर्ले व मालपूर गणात निवडून आले. मात्र त्यात नरडाणे गणातील सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीकडेही सद्यस्थितीत दोनच सदस्य आहेत.
दाऊळ व विखरण हे दोन गण शिवसेनेकडे आहेत. तर अपक्ष चिमठाणे, बेटावद याठिकाणी निवडून आले होते. त्यात चिमठाणे गणातील सदस्याने भाजपात प्रवेश केल्याने १८ पैकी १० सदस्य हे भाजपाचे आहेत. सध्या पं.स.वर भाजपाचे सभापती तर शिवसेनेचे उपसभापती आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीमधून नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपात आल्याने सध्या तरी भाजपाचे पारडे जड आहे. मात्र तो येणाऱ्यांना संधी देणार की जुन्या कार्यकर्त्यांना, यावर चर्चा सुरू असून आमदारकीचे स्वप्न पाहणारेही निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
बाह्मणे गटाचे सदस्य व जि.प.तील विरोधी पक्षनेता कामराज निकम व राष्ट्रवादीचे माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांचे चिरंजीव शिवराज भामरे यांच्या सरळ लढतीत निकम यांनी बाजी मारली होती. मात्र शिवराज भामरे आता भाजपात गेल्याने काँग्रेसतर्फे उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यावेळी बाह्मणे गाव विखरण गटाला जोडल्याने धमाणे गट नव्याने निर्माण झाला. विरदेल गटात आघाडीतर्फे काँगेसचे प्रा.सुरेश देसले यांच्या पत्नी ललिता देसले यांनी बाजी मारली होती. त्या जि.प.महिला बालकल्याण सभापतीही झाल्या. मात्र प्रा. देसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने येथे माजी आमदार रामकृष्ण पाटील हे त्यांच्या पत्नी इंदिराबाई पाटील यांच्यासाठी इच्छुक आहेत. पाटण गांव विरदेलमधून नवीन वर्षी गटात समावेश करण्यात आल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. चिमठाणे गटात भाजपाचे खंडू भिल निवडून आले होते. मात्र ते चिमठाणे ग्रा.पं.चे सरपंच झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर भाजपाचे वासुदेव भिल निवडून आले.खलाणेतून काँग्रेसच्या बेबाबाई मालचे तर नरडाणे गटात भाजपाच्या गुंताबाई सोनवणे विजयी झाल्या होत्या. मेथी गटाच्या काँग्रेसच्या कविता मोरे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आघाडीतर्फे उमेदवाराचा तेथेही शोध सुरू आहे.
१० वर्षांपासून पं.स.वर भाजपाचा झेंडा आहे. या वेळी काँगेस, राष्ट्रवादी या पक्षातून अनेक नेते, कार्यकर्ते भाजपात आले. त्यांना हा पक्ष कसा न्याय देईल, याचीच चर्चा सुरू आहे त्यात सध्या सोशल मीडियावर अनेक इच्छूक उमेदवार समर्थकांमार्फत ‘अमुक गटाचे भाग्यविधाते’, ‘भावी जि.प. सदस्य’ अशा पोस्ट टाकून चर्चेत आम्हीही आहोत, असा संदेश आपापल्या पक्षाच्या नेत्यांना समजण्यासाठी टाकत आहेत.
पक्षीय बलाबल (२०१३)
पक्ष जि.प. गट पं.स. गण
कॉँग्रेस ०३ ०२
राष्टÑवादी ०० ०३
भाजपा ०४ ०८
शिवसेना ०१ ०२
अपक्ष ०१ ०३
एकूण ०९ १८

Web Title: Beginning of the march in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे