बिबटय़ाने पाडला बैलाचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 06:10 PM2017-04-17T18:10:12+5:302017-04-17T18:10:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून गाव परिसरात बिबटय़ाचा संचार वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे
धमनार, जि. धुळे, दि. 17 - साक्री तालुक्यातील दातर्ती येथे रविवारी रात्री बिबटय़ाने नाना भावराव पवार या शेतक:याचा शेतात बांधलेल्या बैलावर हल्ला करीत त्याचा फडशा पाडला. गेल्या काही दिवसांपासून गाव परिसरात बिबटय़ाचा संचार वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
या घटनेची माहिती म्हसदी वनपरिक्षेत्राच्या वनपाल वर्षा चव्हाण यांना देण्यात आली. त्यानंतर वनरक्षक एस. बी. पगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी बैलाच्या गळ्यावर उमटलेले दात व पायाचे ठसे पाहून बिबटय़ानेच हा हल्ला केला असावा, अशी माहिती पगारे यांनी दिली आहे. यापूर्वीही याच गावातील हिरामण पवार, गंगाधार सोनवणे यांच्या मालकीचे पशुधनही बिबटय़ाने फस्त केले होते तर याच गावातील राजा बागुल यांच्यामालकीच्या दोन गुरांवरही बिबटय़ाने हल्ले करून जखमी केले होते.