थकबाकी आता भराल तरच फायदा; नंतर पस्तवाल!

By देवेंद्र पाठक | Published: February 22, 2024 08:59 PM2024-02-22T20:59:32+5:302024-02-22T20:59:56+5:30

आयुक्त : ९८ कोटींच्या वसुलीसाठी प्रसंगी कडक धोरण. 

Benefit only if you pay the dues now | थकबाकी आता भराल तरच फायदा; नंतर पस्तवाल!

थकबाकी आता भराल तरच फायदा; नंतर पस्तवाल!

धुळे : हद्दवाढीतील ११ गावांसह शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे १२७ कोटींच्या मालमत्ता कराची मागणी आहे. त्यापैकी केवळ आतापावेतो २९ कोटी रक्कम जमा झालेली आहे. शास्तीमाफी योजनेत सहभागी होऊन आपल्याकडील थकबाकी भरावी. पुढील आर्थिक वर्षात शास्तीमाफी अजिबात दिली जाणार नाही. थकबाकी वसुलीसाठी कठोर निर्णय घेतले जातील, अशी भूमिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

थकबाकीच्या एकूण मागणीपैकी अतिशय कमी थकबाकीची रक्कम मनपा तिजोरीत जमा झालेली आहे. परिणामी थकबाकी वसुलीसाठी संबंधित थकबाकीदारांना शास्तीमाफी योजनेत समावेशासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात आले. काहींनी सहभाग घेतला असला तरी अजून बरीच थकबाकी जमा होणे आवश्यक आहे. हद्दवाढीतील ११ गावांची सुमारे ६९ कोटींची मागणी आहे. त्यापैकी केवळ ७ कोटी ५ लाखांची वसुली झाली, तर शहरासाठी ५८ कोटींची मागणी असून २२ कोटी २२ लाखांची वसुली झाली. असे एकूण १२७ कोटींच्या मागणीपैकी केवळ २९ कोटी २७ लाख वसूल झाले आहे. आयुक्त म्हणाल्या, ८५ हजार जुन्या मालमत्ता असून, नव्याने ८७ हजार मालमत्ता या सर्वेक्षणातून समोर आल्या आहेत. या सर्वांना मालमत्ता कर लावण्यात आलेला आहे. थकबाकीदारांची संख्या वाढत असल्याने नळ कनेक्शन कटसह बेकायदेशीर नळ घेणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार असून, मागील दोन वर्षांची पाणीपट्टी आणि पुढील वर्षाची रक्कम अशी तिपट्ट कर आकारणी करून वसूल केली जाईल. २५, ५० आणि १ लाखाच्या वरती असणाऱ्या सुमारे १० हजारावर थकबाकीदारांना नोटीस वितरित करण्यात आलेली आहे. मार्चअखेर त्यांनी कराचा भरणा करणे अपेक्षित आहे. शास्तीमाफीची योजनेसाठी माेजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले.

३ मार्चला महालोकअदालत
शास्तीमाफीसह थकबाकीदारांसाठी ३ मार्च रोजी महालोकअदालत आयोजित करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, थकबाकी लवकरात लवकर भरावी. आगामी आर्थिक वर्षात शास्ती माफीची योजना डिसेंबरपर्यंत तरी अजिबात होणार नाही, असेही आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Benefit only if you pay the dues now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे