शबरी घरकुल योजनेचा लाभ ग्रा.पं. सदस्य व परिवाराला दिल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:59 PM2019-03-26T22:59:32+5:302019-03-26T23:00:25+5:30
पिंपळनेर : पुनाजी नगर येथील ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
पिंपळनेर : टेंभे प्र.वार्सा ग्रामपंचायतीने शबरी घरकुल योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांचा लाभ ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या परिवाराला दिल्याचा आरोप पुण्याचापाडा पैकी पुनाजी नगर येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण विकासमंत्री व साक्रीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
टेंभे प्र.वार्सा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पुण्याचापाडा पुनाजीनगर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर भोंगळ कारभाराचा आरोप केला आहे. शबरी घरकुल योजना, स्वच्छतागृह, तसेच १४व्या वित्त आयोगांतर्गत निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, टेंभे प्र.वार्सा ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत १४ पाड्यांचा समावेश असून या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामस्वच्छताअंतर्गत सुमारे ६०० स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी काही स्वच्छतागृहे हे सरपंच व उपसरपंच यांनी मतदान पद्धतीने स्वत: बांधले आहे. मात्र, या स्वच्छतागृहांना अद्यापही दरवाजे बसविलेले नाही. तसेच टाक्याही बांधलेल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थी त्याचा वापर करीत नाही. मात्र, या स्वच्छतागृहाची १०० टक्के देयके अदा करण्यात आलेली आहेत, असे समजते. ग्रामपंचायतीमार्फत चौदाव्या वित्त आयोग आर्थिक वर्षाचे विकास कामे घेण्यात आलेली आहे. त्यात समाज मंदिराची कामे मोठ्या प्रमाणावर आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाची ही कामे आहेत. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला असून याची चौकशी करण्याची मागणी विकास बागुल, सुरेश ठाकरे, योगेश भोये, ज्ञानेश्वर बागुल, शालिग्राम भोये, शिवाजी अहिरे, सुनिल पवार, एकनाथ देशमुख, अनिल देशमुख, छोटीराम बागुल, अजय गायकवाड, लक्ष्मण बागुल, संजय गायकवाड, खंडू पवार, रामू शिंदे, केशव गायकवाड, गमन देसाई यांनी केली आहे.
घरकुल वाटपात ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या वर आहे त्यांना घरकुल देता येत नाही. त्यामुळे कुठलाही अन्याय कोणावरही झालेला नाही. ग्रामसभेत या सर्व विषयांवर चर्चा होत असते. होत असलेले आरोप चुकीचे आहेत. सुरु असलेली विकासकामे काही ग्रामस्थांना रुचत नसल्याने ते आमच्यावर चुकीचा आरोप करीत आहेत.
-सचिन राऊत, सरपंच टेंभे प्र. वार्सा