भामरे, पाटील कुटुंबीय विकासाचे शत्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:01 PM2019-03-30T13:01:58+5:302019-03-30T13:02:51+5:30
भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबतच भाजपावरही निशाणा साधला
धुळे : धुळे लोकसभा मतदार संघातून बंड करीत अपक्ष उमेदवारी जाहीर केलेले भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा पत्रकाद्वारे भूमिका मांडत काँग्रेससोबतच भाजपावरही निशाणा साधला आहे. ‘कॉँग्रेस आणि भाजपा यांचा प्रचार म्हणजे कौटुंबीक हेव्यादाव्यांचा धोबीघाट असून विकासाचा मुद्दाच त्यांच्याकडे नाही’ अशी टीका त्यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी लोकसभा निवडणुकीचे कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील व भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्यावर टीका केली आहे.
कै.चुडामण पाटील १६ वर्षे या मतदारसंघाचे खासदार होते. त्यांनी या कालावधीत केवळ मोहाडीसाठी रेल्वे स्टेशन केले. तर त्यांचे पुत्र व माजी मंत्री रोहिदास पाटील हे राज्याच्या राजकारणात ३० वर्षे आमदार, मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी केवळ अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीसाठी तब्बल २५ वर्षे खर्ची घातली. तसेच शेतकऱ्यांशी निगडीत धुळे तालुका खरेदी-विक्री संघ, धुळे तालुका दूध उत्पादक संघ आर्थिक अडचणीत आणून ठेवल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला आहे.
तर भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांचे वडील कै.रामराव पाटील यांना १९८० व १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात एकही विकासाचे काम केले नाही. त्यांनी जिल्हा बॅँक, पांझराकान सहकारी साखर कारखाना यांची वाट लावली. तर त्यांचे पुत्र डॉ.सुभाष भामरे यांना अनेक पक्ष बदलून शिवसेनेत आल्यानंतर २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये अपघाताने मराठा जात व पंतप्रधान मोदींच्या पुण्याईमुळे ते विजयी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.