कोरोनामुळे भीमस्मृती यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:11 PM2020-07-30T22:11:24+5:302020-07-30T22:11:44+5:30

प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना परवानगी : प्रातिनिधीक स्वरुपात बाबासाहेबांना अभिवादन

Bhimsmriti Yatra canceled due to corona | कोरोनामुळे भीमस्मृती यात्रा रद्द

dhule

Next

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन दिवस मुक्काम केलेल्या लळींग कुरणातील लांडोर बंगल्यावरील भीम स्मृती यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे़ गेल्या वीस वर्षांपासून भरणारा भीम अनुयायांचा या मेळाव्याला कोरोनाच्या संसर्गामुळे पहिल्यांदाच खंड पडणार आहे़
दरवर्षी ३१ जुलैला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासह शेजारच्या गुररात आणि मध्यप्रदेशातील हजारो अनुयायी लांडोर बंगल्यावर येतात़ परंतु यावर्षी कोरोनाची आपत्ती असल्याने गर्दीमुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने भीम स्मृती यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या भीम अनुयायांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून समाज बांधवांनी घरी राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
प्रातिनिधीक स्वरुपात अभिवादन करण्यासाठी प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना लांडोर बंगल्यावर जाण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे़ त्यात रिपाईचे नेते वाल्मिक दामोदर, जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, दिलिप साळवे, शोभा चव्हाण, नयना दामोदर, राजू शिरसाठ, महेंद्र निळे यांच्यासह इतर पदाधिकाºयांचा समावेश आहे़ सकाळी १० वाजता शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पदाधिकरी लांडोर बंगल्यावर जाणार आहेत़
दरम्यान, लांडोर बंगल्यावर गर्दी होवू नये यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रवेशद्वार बांबू लावून बंद करण्यात आले आहे़ याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे़ तसेच लळींग कुरणातील लांडोर बंगल्याचे प्रवेशद्वार देखील कुलूप लावून बंद करण्यात आले आहे़ लांडोर बंगल्याकडे जाणाºया इतरही छुप्या रस्त्यांवर पोलिसांचा पहारा असणार आहे़
भीमस्मृती यात्रा रद्द झाली असली तरी या दिवसाचे महत्व असल्याने वन विभागातर्फे लांडोर बंगल्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे़ बंगल्याच्या चौफेर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत़
मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे़ या कायद्यातील तरतुदीनुसार जाहीर कार्यक्रमांवर प्रतिबंध लावला आहे़ आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचा धुळे शहरात तीन दिवस मुक्काम
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धुळे शहरात तीन दिवस मुक्काम केला होता. सन १९३७ मध्ये ते शहरात न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. तवंग नावाच्या वकिलांचा खटला चालविण्यासाठी त्यांना धुळे शहरात बोलाविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि. २९, ३० व ३१ जुलै १९३७ ला तीन दिवस शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम केला आणि धुळे जिल्हा व शहराची सविस्तर माहिती घेतली होती. त्याकाळात शहरातील अ‍ॅड. प्रेमसिंग तवंग यांच्या खटल्याच्या कामकाजाला मदत करण्यासाठी डॉ. आंबेडकर हे धुळे शहरात आले असता त्यांनी शहरातील विजयांनद चित्रमंदिरामध्ये जाहीर सभा घेवून जनतेला मार्गदर्शन केले. धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग किल्ल्यावर विश्वासू लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांना भेटायला गेले. त्यांच्या घरीच भोजन करून डोंगरावरील लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले. गप्पा, विनोदात वेळ घातला. बाबासाहेबांनी शहरातील गरूड वाचनालयाला भेट दिली आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला देखील भेट देऊन अभिप्राय नोंद केला आहे. त्याचा आजही संग्रह आहे. आण्णासाहेब लळींकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्वरचित अहिराणी गीते गावून तर तालुक्यातील नरव्हाळचे दिवंगत रतन जाधव या शाहीराने आपल्या शाहिरीतून बाबासाहेबांचे मनोरंजन केले. दि. १ आॅगस्टला बाबासाहेब मुंबईला परत जाताना आण्णासाहेब लळींगकरांना तात्कालीन धुळे जिल्ह्यातील तालुका असलेल्या नंदुरबार या आदिवासी मागास असलेल्या गावी जावून शैक्षणिक कार्य करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लळींगकर यांनी नंदुरबार शहरात जिल्ह्याचे तत्कालीन धुळे जिल्हाधिकारी कॅप्टन कुºहे यांच्या हुकुमाने साक्री नाका परिसरात पातळगंगा नदीकिनारी जागा मिळवली होती आणि त्याठिकाणी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी छात्रालयाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त अजूनही ३१ जुलै रोजी लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे दलित बांधवांचा मेळावा भरतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Web Title: Bhimsmriti Yatra canceled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे