धुळ्याच्या ‘गुलाबा’ची दिल्लीकरांना ‘भुरळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 08:45 AM2018-10-04T08:45:16+5:302018-10-04T08:56:22+5:30
शेतीमध्ये करण्यासारखे खूप काही आहे. मनात जिद्द आणि प्रयोगशिलता असेल तर शेतकरी कसा यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण जयेश भरत पवार (वलवाडी, धुळे) या उच्चशिक्षित तरूणाने सर्वांसमोर ठेवले आहे.
अतुल जोशी
धुळे : शेतीमध्ये करण्यासारखे खूप काही आहे. मनात जिद्द आणि प्रयोगशिलता असेल तर शेतकरी कसा यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण जयेश भरत पवार (वलवाडी, धुळे) या उच्चशिक्षित तरूणाने सर्वांसमोर ठेवले आहे. त्यांनी अवघ्या अर्धा एकर क्षेत्रावर गुलाबाची शेती फुलवली आहे. यातून त्यांना चांगली अर्थप्राप्तीही सुरू झालेली आहे. जयेश पवार यांनी बीएसस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण घेतले आहे. सुरूवातीपासूनच त्यांना नोकरीऐवजी पोल्ट्री फार्ममध्येच रूची होती. गोंदूर शिवारात त्यांची दोन एकर शेती आहे. गुलाबाला असलेली मागणी, त्यातून मिळणारे आर्थिक उत्पन्न याचा विचार करून त्यांनी गुलाब शेती करण्याचे ठरविले. दोन एकर क्षेत्रापैकी अर्धा एकर क्षेत्रात पोल्ट्रीफार्म सुरू केला. तर अर्ध्या एकरमध्ये त्यांनी गुलाब शेतीचा अभिनव प्रयोग करण्यास प्रारंभ केला. यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडी येथे प्रशिक्षणही घेतले.
ते स्वत: उच्चशिक्षित असल्याने रोपांची लागवड, त्यांना हव्या असलेल्या घटकद्रव्याची मात्रा, पाणी आणि फवारणीचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन या गोष्टी त्यांना चांगल्यापैकी ज्ञात असल्याने, त्याचाही फायदा गुलाबाची शेती करतांना झाला. त्यांनी उभारलेल्या पॉली हाऊसमध्ये ‘टॉप सिक्रेट’ या डच प्रजातीच्या गुलाबाच्या तब्बल २२ हजार रोपांची लागवड केली. त्यांनी फुलविलेला गुलाबशेतीचा मळा अनेकांना आकर्षिक करू लागला आहे. २२ हजार रोपांना आता कळ्या लागलेल्या आहे. लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलामुळे परिसराला नवे रूप मिळालेले आहे. या शेतीतून दररोज २३०० ते २४०० फुले निघत असतात. मंदीच्या काळात बाजारपेठेत ६० रूपयांना २० फुले तर तेजीच्या काळात ८ ते १० रूपयाला एका फुलाची विक्री होत असते असे त्यांनी सांगितले.
रोज सकाळी १० ते १२ यावेळेत फुलांची तोडणी होत असते. त्यानंतर ते विशिष्ट पद्धतीने पॅक केले जातात. सायंकाळी ते ट्रॅव्हल्सने नाशिकला व तेथून अजमेरमार्गे दिल्लीला निर्यात केले जातात. तत्पूर्वी अजमेरला नेल्यावर त्याठिकाणी कोल्डस्टोरेजमध्ये ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला पाठविले जातात. धुळ्यातील गुलाबांना जम्मु -काश्मिरलाही मागणी आहे. मात्र वाहतुकीची समस्या असल्याने, तूर्त त्याठिकाणी फुले पाठविता येत नाही. यापूर्वी ते नागपूरला गुलाब पाठवित होते.
उपलब्ध पाण्यावर योग्य नियोजन करून शेती पिकविणे, फुलविणे, त्यातून स्वत:बरोबर मजुरांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे ही तारेवरची कसरत आहे. मात्र जयेश पवार यांनी ही कसरतही लिलया पद्धतीने पार पाडत शेतीला गुलाब शेतीचा पर्याय प्रभावीपणे लागू होऊ शकतो हे आपल्या मेहनत, नियोजनातून दाखवून दिले आहे.
शेती परवडत नाही असे म्हटले जाते. मात्र योग्य नियोजन करून, त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती ही खूप फायदेशीर आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. गुलाब शेतीच्या माध्यमातून खर्च वगळता वर्षाला १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळते अशी माहिती जयेश पवार यांनी दिली. एवढेच नाही तर ‘ व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवसात गुलाबाला सर्वात जास्त मागणी असते. या काही दिवसातच ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळत असते. शेतक-यांनी आधुनिक शेतीकडे वळावे असा सल्लाही जयेश पवार यांनी दिला आहे.