बिजासन घाटात धावता ट्रक जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:09 PM2018-11-25T22:09:16+5:302018-11-25T22:09:58+5:30
चालकाचे प्रसंगावधान : ट्रक बाजूला उभा करून उड्या मारल्याने वाचले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात शिरपूरकडून इंदौरकडे कापसाच्या गाठी घेवून जाणाºया ट्रकने अचानक पेट घेतला. यात कापसाच्या गाठीसह ट्रक पूर्णत: जळून खाक झाला़ आगीमुळे मार्गावर दोन्ही बाजूला २ ते ३ किमीपर्यंत रहदारी ठप्प झाली होती.
२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिरपूरकडून इंदौरकडे कापसाच्या गाठी घेवून जाणाºया एम़पी़०९-बीएफ-६७५४ क्रमांकाच्या ट्रकने अचानक पेट घेतला़ गाडीत प्लॅस्टीक पन्नी, कापसाच्या गाठी असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे चालकाने प्रसंगावध राखत गाडीला रस्त्याच्या बाजूला नेत उड्या मारल्या. यामुळे त्यांचे प्राण वाचले. आगीमुळे ४ ते ५ लाख रूपये किंमतीच्या कापसाच्या गाठीसह ३ लाखाचा ट्रक पूर्णत: जळून खाक झाला़ घटनास्थळी मोबाईलमध्ये आगीची क्लिप काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेचे वृत्त कळताच सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलिस कर्मचारी शाम वळवी, अनारसिंग पवार, संजय धनगर, राजेंद्र मांडगे, संजय नगराळे, सहीद शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शिरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असताना हवा व गाडीतील कापसाच्या गाठींमुळे आग आटोक्यात आणण्यात बराच वेळ गेला़ तोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे २ ते ३ किमीपर्यंत रहदारी पूर्णत: ठप्प झाली़ अग्निशामक दलाच्या ४ गाड्यांनीही आग आटोक्यात आली नाही़ रात्री उशिरा आग आटोक्यात आणल्यानंतर रहदारी पूर्ववत करण्यात आली़ यासंदर्भात रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़