नळाच्या पाण्यात पक्ष्यांची पिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:57 PM2019-04-05T22:57:45+5:302019-04-05T22:58:00+5:30
तक्रार : ग्रामपालिकेपुढे जीर्ण जलकुंभावर झाकण बसविण्याचे आव्हान
निजामपूर : येथील बस स्टँडच्या मागे असलेला जलकुंभ जीर्ण झाला आहे. त्याच्या छतावरील झाकण तुटून जलकुंभात पडले आहे. या जलकुंभावर कबूतर, कावळे आदी पक्ष्यांचा थवा बसलेला असतो. त्यामुळे या पाण्यात पक्ष्यांची पिसे, विष्टा पडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. दरम्यान, काही नागरिकांनी सरपंचांकडे नळाच्या पाण्यात पक्ष्यांची पिसे आढल्याची तक्रार केली आहे.
या जलकुंभाचे बांधकाम १९८४ मध्ये झाले आहे. आता हा जलकुंभ जीर्ण झाला असून जागोजागी प्लास्टर निखळून पडले आहे. जलकुंभावर पिंपळ वृक्ष देखील वाढत आहे. जलकुंभाच्या छतावरील झाकण तुटून टाकीत पडले आहे. त्यामुळे जलकुंभात पक्ष्यांची पिसे, विष्टा पडू नये, यासाठी उपाय योजना तरी कशी करावी, अशी समस्या ग्रामपालिकेस भेडसावत आहे.
पक्षी जलकुंभात शिरु नये. यासाठी जलकुंभावर नवीन झाकण किंवा जाळी बसवावी लागणार आहे. मात्र, जलकुंभ बराच उंच आहे. आणि वर चढण्यासाठी असलेली लोखंडी शिडीही पार गंजून गेली आहे. एका ठिकाणी तर शिडीला आधारही नाही. टाकीवर खिळे ठोकायचे तर बांधकाम तुटते. जलकुंभावर चढण्यास कुणी धजावत नाही. त्यामुळे ही समस्या कशी दूर करावी, या विवंचनेत ग्रामपालिका असल्याचे सरपंच सलीम पठाण यांनी सांगितले.
आता एस.के. नगरात नवीन जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तोपर्यंत या जलकुंभातूनच गावास पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर हा जलकुंभ पाडला जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या जलकुंभावरुन पाणीपुरवठा सुरु आहे. तोपर्यंत या जलकुंभाची देखरेख ठेवणे आवश्यक आहे. मात्र, जलकुंभ जीर्ण झाल्याने अडचणी येत आहेत. त्यावर जिकीरीने तोडगा काढून जलकुंभावर हिरव्या कापडी जाळीचे आच्छादन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.