जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापतीपदावर भाजपचे उमेदवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 01:31 PM2020-01-30T13:31:32+5:302020-01-30T13:32:13+5:30
भाजपकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव धरती देवरे यांच्याकडे महिला बालकल्याण समिती सभापतीपदाचा पदभार. समाजकल्याण सभापतीपदी मोगराबाई पाडवी. उर्वरित दोन सभापतींचे विभाग सर्वसाधारण सभेत ठरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतांनाही महाविकास आघाडीतर्फेही चारही विषय समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या सभापतीपदाच्या उमेदवारांना प्रत्येकी ४० तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी १६ मते मिळाली.
सभापतीपदी धरती देवरे, मोगराबाई पाडवी, मंगलाबाई पाटील, रामकृष्ण खलाणे, यांची निवड जाहीर होताच भाजप समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान चार पैकी तीन विषय समितींच्या सभापतीपदावर महिला सदस्यांची निवड झाल्याने, विषय समिती सभापतीपदावर महिलाराज अवतरले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ५६ पैकी ३९ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्याच आठवड्यात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विषय समिती सभापतींच्या निवडीकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून होते. सभापतीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र यात काहींना यश आले तर काहींना पुढील अडीच वर्षांपर्यंत ‘थांबा आणि वाट पहा’असा सल्ला देण्यात आलेला आहे.
विषय समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यांना प्रांताधिकारी भीमराज दराडे, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांनी सहकार्य केले.
उमेदवारांचे अर्ज दाखल
सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी १ वाजेपर्यंत होती. तत्पूर्वी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास भाजपतर्फे महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी धरती निखील देवरे, समाज कल्याण समिती सभापतीपदासाठी मोगराबाई जयवंत पाडवी, व अन्य दोन समितींसाठी रामकृष्ण खलाणे, मंगला सुरेश पाटील यांनी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या उपस्थितीतच पीठासीन अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले.
तर महाविकास आघाडीतर्फे महिला बालकल्याणसाठी चंद्रकला हेमराज पाटील (कॉग्रेस), समाज कल्याणसाठी डॉ.नितीन पोसल्या सूर्यवंशी (राष्टÑवादी), जिजाबाई भाईदास पारधी (कॉँग्रेस,), देवीदास दत्तात्रय माळी (शिवसेना) यांनी अर्ज दाखल केले होते.
दुपारी झाली सभा
दुपारी ३ वाजता सभापतीनिवडीसाठी सभा सुरू झाली. सुरवातीचे दहा मिनीटे अर्ज माघारीसाठी देण्यात आले. मात्र कोणीही अर्ज माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. यावेळी अपक्ष सदस्यानेही भाजपला सहकार्य केले.
यात भाजपच्या सभापतीपदाच्या चारही उमेदवारांना प्रत्येकी ४० तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना १६ मते मिळाली. सभापतीपदी भाजप उमेदवारांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
सभापतीपदी भाजप उमेदवारांची निवड जाहीर होताच भाजप समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण केली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी प्रशासनातर्फे नवनिर्वाचित सभापतींचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम निकम, कामराज निकम, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान निवडीच्या वेळी कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आवारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.