तीन वर्षात भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:30 PM2017-12-08T14:30:14+5:302017-12-08T14:42:09+5:30
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची टीका, शिंदखेड्यात झाली सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा: ‘अच्छे दिन’चे स्वप्न जनतेला दाखवून केंद्र व राज्यात सत्ता मिळविणारे भाजपा सरकार गेल्या तीन वर्षाच्या काळात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, जनता, व्यापारी हे त्रस्त झालेले आहेत. भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही.त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्या असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केले.
शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीनिमित्त कॉंग्रेसची प्रचार सभा शुक्रवारी शहरातील गांधी चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहीदास पाटील, डॉ. हेमंत देशमुख, आमदार डी.एस. अहिरे, अब्दुल सत्तार, कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, कॉँग्रेसच्या अॅड.ललिता पाटील आदी होते.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मोदी लाटेवर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली. ‘मन की बात’, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. सरकारतर्फे विकास कामांची वल्गना केली जात असतांना, प्रत्यक्षात काही होत नसल्याने, सरकारने आता ‘काम की बात’ करावी अशी परिस्थिती असल्याचे सांगत, चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
बोंडअळीमुळे नुकसान
राज्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे १७०० कोटी रूपयांचे नुकसान झाले. सरकारने १५ लाख शेतकºयांना ३४०० कोटी रूपयांची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत.
सरकारतर्फे ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जातो आहे. परंतु हे मेक इन इंडीया नव्हे तर फेक इन इंडीया आहे. जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविणारे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी जे नांदेड मनपा निवडणुकीत जनतेने करून दाखविले तेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत करून, कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.