नोकर भरती न करता भाजपने पक्ष भरती केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:49 PM2020-01-04T22:49:51+5:302020-01-04T22:51:23+5:30
शिरपूर तालुका। धनंजय मुंडे यांनी विखरण येथे भाजपवर केली टीका
शिरपूर : भाजपने ७२ हजार नोकऱ्यांची मेघा भरती करणार अशी आमिषे दिली पण नोकरी भरती केलीच नाही़ केवळ स्वत:च्या पक्षाची भरती केली़ जे-जे गेले भाजपत ते-ते ८० टक्के पडलेत, ही आहे नियती असल्याचे राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी विखरण येथील प्रचारसभेत सांगितले.
शनिवारी सायंकाळी विखरण येथील नवे दत्त मंदिर परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे, युवक राष्ट्रवादीचे ईशाद जागीरदार, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, नाना महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, डॉ़जितेंद्र ठाकूर, दिनेश मोरे, निलेश गरूड, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, लिलाचंद लोणारी, धीरज सोनवणे, अशफाक शेख तसेच विखरण-तºहाडी गट-गणातील उमेदवार उपस्थित होते़
मंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले, आजच्या दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आहे़ बीडहून निघालो अन् थेट तुमच्यात आलो़ भाजपाच्या ताब्यात असणारी बीडची जि़प़ राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा ताब्यात घेतली़ बीडचा विजय सोबत घेवून विखरणच्या मातीत आलो़ पहिल्यांदाच या परिसरात माझी सभा होत आहे. तुम्हीही कधी बोलावले नाही़, असे मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व गुंड, भ्रष्टाचारी, रॉकेलवाले, सट्टा-मटकावाले भाजपात आल्याचा आरोप केला. यावेळीज्योती पावरा, डॉ़जितेंद्र ठाकूर यांनी देखील मनोगत व्यक्त केलीत़ प्रास्तविक रमेश करंकाळ तर सुत्रसंचालन राहुल साळुंखे यांनी केले़ यानंतर होळनांथे येथे ही त्यांची प्रचार सभा झाली.