धुळे महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी भाजपाच्या बालीबेन मंडोरे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:30 PM2018-01-19T12:30:58+5:302018-01-19T12:32:12+5:30
सभापती निवड प्रक्रिया : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सौम्य लाठीचार्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका बालिबेन मंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला़ त्यांना ८ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश देवरे यांना ७ मते मिळाली़ अवघ्या एका मताने विजयाची माळ मंडोरे यांच्या गळ्यात पडली़ फटक्यांची आतषबाजी करण्यात आली़ शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्रा पाटील यांची अनुपस्थिती होती़ दरम्यान, निवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला़ पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी सभागृहात मज्जाव करण्यात आला होता़
महापालिकेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती निवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी नगरसेवकांना घेवून येणाºया वाहनाला अडविण्यात आले़ परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वीच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली़ या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम आहे़ येथील महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरुवात होण्यापुर्वी हितचिंतकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली़ सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष असल्याने आणि नगरसेवकांचा पळवा-पळवी होऊ शकते असा अंदाज असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता़ प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख गुलाब हे वाहनाने दाखल झाल्या़ त्यावेळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली़ यावेळी अन्य कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी सुरुवातीला जमा होत असलेली गर्दी हटविली़ तरीही काहीही फरक पडत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे धावपळ उडाली होती़ घटनास्थळी स्वत: अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, धुळे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात होता़.