‘इलेक्टिव्ह मेरिट’, संयमी भूमिकेच्या जोरावर भाजपचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:15 PM2018-12-10T23:15:30+5:302018-12-10T23:16:03+5:30
सूक्ष्म नियोजनावर दिला भर : बंडखोरीचा दबाव झुगारत यशस्वी खेळी, मुख्यमंत्र्यांच्या सभेचाही फायदा
निखील कुलकर्णी।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीत स्पष्ट बहूमत मिळवत भाजपने कोण ‘पॉवरफुल्ल’ हे दाखवून दिले़ ‘इलेक्टिव्ह मेरिट’, संयमी भुमिका व अखेरच्या क्षणी झालेला धनशक्तीचा वापर हे भाजपच्या विजयाचे यशस्वी गणित ठरले़
मनपा स्थायी समितीत केवळ एक सदस्य असतांना सभापती पदावर वालिबेन मंडोरे यांना विराजमान करत भाजपने निवडणूकीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते़ त्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गजांना भाजपने ‘इलेक्टिव्ह मेरिट’ लक्षात घेऊन प्रवेश दिला व त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला़ त्याचप्रमाणे आमदार अनिल गोटे यांच्या बंडखोरीचा दबाव व टिका यांना सामोरे जातांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जयकुमार रावल या मंत्र्यांनी दाखवलेला संयम देखील तितकाच महत्त्वाचा ठरला़ पण संयम राखत असतांनाच त्यांनी टिकेला योग्य वेळी उत्तरे देत जनतेसमोर वास्तववादी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला़ भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा खरा कस निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात लागला़ परंतु संयम राखत आमदार गोटे यांना अखेरपर्यंत झुलवत ठेऊन भाजपने ऐनवेळी एकटे पाडले व त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मदतीचा हात घेतला ही भाजपची सर्वात यशस्वी खेळी ठरली व लोकसंग्रामचा पराभव झाला़
शिवसेनेला अंतर्गत गटबाजी, काही विकास कामांना विरोध केल्याने आमदारांशी झालेला संघर्ष व त्यातून झालेली पक्षाची बदनामी, प्रभागात मर्यादित विकास व प्रभावी प्रतिस्पर्धी यांमुळे पराभव पत्करावा लागला़ राष्ट्रवादी-काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी स्पर्धेत अखेरपर्यंत ते यशस्वीपणे टिकून राहिले़ एमआयएमने जळगाठपाठोपाठ धुळयात मिळवलेले यश लक्षवेधी ठरले़तर सपाची एक जागा गटबाजी व मत विभाजनामुळे कमी झाली़ बसपाने विकासाच्या जोरावर एकमेव जागा कायम राखली़