भाजपच्या गुंडांनी गाडीवर हल्ला केला; पोलिसांवरही गोटे यांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 08:57 AM2018-12-09T08:57:16+5:302018-12-09T12:09:37+5:30
धुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री हल्ला झाला.
धुळे : धुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री हल्ला झाला. यावेळी धावपळ झाल्याने गोटेंची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा भ्याड हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचे सांगतनाच त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.
मी चहा पिण्यासाठी थांबलो असताना गाडीवर दगड फेकल्याचा आवाज आला. या आवाजामुळे घाबरून पळापळ झाली. पाहतो तर कारच फुटलेली होती आणि कार्यकर्ते जमू लागले होते. पोलिसांवर विश्वास नसल्याने गुन्हा दाखल केलेला नसल्याचे ते म्हणाले.
गाडीवर केलेला हल्ला हा दुसरा तिसरा कोणा नसून भाजपच्या गुंडांनी केला आहे. पोलीस चोर आहेत. विकले गेले आहेत. काय गुन्हा दाखल करणार? परवा कार्यकर्त्यावर हल्ला झाला तेव्हा ही पोलिसांनी काय केले? उलट त्याच्यावरच 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला. गिरीष महाजन, जयकुमार रावल आणि तिसरा डॉ. भामरे कार्यकर्त्याला घरी जाऊन सांगतात गुन्हा दाखल कर म्हणून. मी अशा लोकांविरोधात लढतोय, असेही गोटे म्हणाले.
दरम्यान, आमदार अनिल गोटे हे कल्याण भवन येथे उपस्थित असतांना त्यांचे वाहन क्रमांक एमएच १८ एजे ३३६६ हे चालक साजिद खान कल्याण भवन परिसरातील बाहेर काढत असतांना दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी समोरून चालकाशेजारील बाजूला काचावर दगडफेक केली व काही क्षणात ते फरार झाले़ या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली़ आमदार गोटे यांच्या समर्थकांकडून भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़